मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग बच्चू कडूंनी सांगितली ‘ही’ तारीख
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे सुतोवाच केले.
यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नसली पाहिजे. आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागणार, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन २१ ते २२ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार होणे महत्त्वाचे आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर तो २०२४ नंतरच होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
दरम्यान यावेळी बच्चू कडू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भातही भाष्य केले. काही बाजू सोडल्या तर न्यायाच्या बाजूने निकाल झाला आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी जे काही केले, कागदपत्रं जमा केली, ज्या पद्धतीने व्यूहरचना आखली, ते सगळं व्यवस्थित होते. त्यामुळे सत्तेच्या बाजूने निकाल लागला. विरोधी पक्षाकडून काही चुका झाल्या. पण जनतेला काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे लोक खुश आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितले
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मोजक्याच आमदारांना संधी मिळाली होती. मंत्रिपद हुकलेले आमदार त्यामुळे नाराज होते. बराच काळापासून हे नाराजी आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक आमदारांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात साधारण १५ ते १९ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी चर्चा आहे. राज्य सरकारच्या सध्याच्या मंत्रीमंडळात एकूण २० मंत्री आहेत. यात आणखी १५ ते १९ मंत्र्यांची भर घालण्यात येणार असून, त्यानंतर नव्याने खातेवाटप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या मंत्र्यांची भर पडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या यादीतही बरेच बदल केला जाऊ शकतो.
Edited By- Ratnadeep Ranshoor