शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (11:53 IST)

Accident :समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, 12 ठार, 23 जखमी

accident
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 लोक मृत्युमुखी पडले तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (15 ऑक्टोबरला) पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
 
टेम्पो ट्रॅव्हल (MH20 GP 2212) आणि ट्रक (MP09 MH 6483) यांची टक्कर होऊन हा अपघात झाला. ही वाहने छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात होते. समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलमधील प्रवासी बुलढाणा येथील सैलानी बाबा यांचं दर्शन घेऊन शिर्डीला जात होते.
 
सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते.
 
दर्शन आटोपल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने सर्वजण नाशिककडे निघाले असताना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वैजापूर जांबरगाव शिवारातील टोलनाक्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या ट्रकवर ही गाडी धडकली.
 
हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरचा पूर्णपणे चक्काचूर होऊन चालकासह बारा जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच वर्षाच्या मुलीचा देखील यामध्ये समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली.
 
वैजापूर पोलिस आणि रुग्णालयाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाच ते सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. तपासीणीनंतर 12 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी झालेल्या 20 जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. जखमींपैकी 14 जणांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आलंय.
 
मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.- ; तनुश्री लखन सोळसे (वय 5 वर्षे) , संगीता विकास अस्वले (वय 40 वर्षे), अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे), रतन जगधने (वय 45 वर्षे), कांतल लखन सोळसे (वय 32 वर्षे), रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे), हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 70 वर्षे), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे), अमोल झुंबर गांगुर्डे (वय 50 वर्षे), सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे), मिलिंद पगारे (वय 50 वर्षे) आणि दीपक प्रभाकर केकाने (वय 47 वर्षे).
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक्सवर त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणतात, "छत्रपती संभाजीनगरनजीक एक खाजगी वाहन, ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
 
20 जखमींपैकी 14 जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी स्वतः तेथे पोहोचले आहेत. 6 जखमींवर वैजापूर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
 
पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झालं असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
 
प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी' (PMNRF) मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रूपये देण्याची घोषणा पंतप्रधानांतर्फे करण्यात आली आहे.
 
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे?
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
 
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
 
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
 
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा सामावेश आहे.
 
20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र
या मार्गावर 50 हून अधिक उड्डाणपूल आणि 24 इंटरचेंजेस आहेत. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट आहेत.
 
दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा, फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील, असं सांगण्यात आलं आहे.
 
समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसंच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
 
महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महामार्गावर लँडस्केपींग, ब्रिज ब्युटीफीकेशनची सुविधा असेल.
 
हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
 
या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनी विरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
 
सुरुवातीला विरोध नंतर बाळासाहेबांचंच नाव
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पासाठी जमीन भूसंपादनाला अनेक ठिकाणी कडाडून विरोध झाला.
 
पाच पट मोबदला देऊन जमीन भूसंपादित करण्यात आली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध केला पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली.
 
या महामार्गाला हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावं देण्याची मागणी 2014 च्या युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा आग्रह होता.
 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे नावं बदलून हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं.
 

Published By- Priya Dixit