संतप्त नातलगांनी संशयित अपहरणकर्त्याच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  डोळ्यांदेखत तरुणाने मुलीचे अपहरण केले. त्यामुळे अपमानित झालेल्या मुलीच्या आई-वडिलांनी रविवारी सायंकाळी देवळाली कॅम्प परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. यानंतर संतप्त नातलगांनी संशयित अपहरणकर्त्याच्या घरासमोरच या दोघांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना भरवीर बुद्रुक (ता. इगतपुरी) येथे घडली. संशयित तरुण फरार आहे.
				  													
						
																							
									  
	 
	आई-वडिलांसोबत दुचाकीवर बसून विंचूरदळवी येथून भरवीरकडे जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला कथित प्रियकराने साथीदारांच्या मदतीने पळवले. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने भरवीर बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील मंजुळा निवृत्ती खातळे (४०), निवृत्ती किसन खातळे (४७) या दांपत्याने रविवारी सायंकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. दरम्यान, उत्तरीय तपासणी केल्यानंतर सोमवारी सकाळी दाेन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी  भरवीर गावात दाखल झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी त्यावर मुलाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. 
				  				  
	 
	भरवीर बुद्रुक येथील मंजुळा निवृत्ती खातळे,निवृत्ती किसन खातळे हे दोघे आपल्या १९ वर्षीय मुलीला घेऊन विंचूर दळवी येथील तिचे मामा दिगंबर भीमा शेळके यांच्या घरी रविवारी दुपारी आले होते. काम आटोपून हे तिघेही दुपारी एक वाजेच्या सुमारास पुन्हा विंचूर दळवी येथून पांढुर्लीमार्गे भरवीरकडे दुचाकीवर जाण्यास निघाले. यावेळी पांढुर्ली गावाच्या पुढे असलेल्या वाजे पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनातून आलेल्या समाधान झनकरसह काही तरुणांनी त्यांच्या दुचाकीला गाडी आडवी लावत खातळे दांपत्याला मारहाण केल्याचे तक्रारी म्हटले आहे.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  त्यांच्यासमोर मुलीला गाडीत बसवून पलायन केले. दरम्यान, मुलीला गावातीलच समाधान झनकर या तरुणाने पळून नेल्याने समाजात नामुष्की होईल या भीतीने खताळे दांपत्याने रागाच्या भरात देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन समोर भरधाव वेगातील एक्सप्रेस रेल्वेखाली आत्महत्या केली.
				  																								
											
									  
	
	Edited By- Ratnadeep Ranshoor