शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (21:30 IST)

‘त्या’ व्हिडीओप्रकरणी संजय राऊतांकडून अनिल परब यांची पाठराखण; म्हणाले…

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मंगळवारी अटक करण्यात आली होती. रात्री उशिरा जामिनावर मुक्तता करण्यात आली. यादरम्यान वाहतूक मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना धमकीचं एक निनावी पत्र आलं होतं. त्या पत्राच्या आधारे काही लोकांना अटक झाली होती. त्यांच्याविषयी काय पुरावे हे आहेत याचे संभ्रम आहेत. योगी आदित्यनाय यांच्याविषयी सोशल मीडियावर उपशब्द वापरले गेले. देशद्रोहाच्या आरोपाखाली पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते त्यांना अटक करुन तुरुंगात डांबलेलं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना जाहीरपणे कोणी मारण्याच्या धमक्या देत असेल आणि ती व्यक्ती कितीही मोठी असेल आणि त्याच्यावर कारवाई झाली असेल तर त्याच्यावर एवढा गोंधळ करण्याचं कारण नाही आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
“राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत आहे का असा प्रश्न विचारला असता, ही सुडबुद्धीची व्याख्या एकदा समजून घेतली पाहिजे. सुडाने कारवाई करायला आमच्या हातामध्ये सीबीआय किंवा ईडी नाही. या देशात सुडाने काय आणि कुठे कारवाया होत आहेत यासंदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल परब, प्रताप सरनाईक यांच्यावर ज्या कारवाई सुरु आहेत त्याला सुडाच्या कारवाया म्हटल्या जातात. महाराष्ट्रात धमकीच्या गुन्ह्यात कारवाई झाली ती सुडाची कारवाई होते?,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनिल परब यांच्या व्हिडिओ क्लिपसंदर्भात प्रश्न विचारला असता, “सरकारला पोलिसांना आदेश देण्याचा अधिकार नाही का? ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी क्लिप पाहिलेली नाही. पण मंत्रीमंडळातील मंत्री हा सरकारचा एक भाग असतो. तुम्ही त्यांचे नाव ऐकले का याला अटक करा किंवा त्याला अटक करा? भास्कर जाधव मंत्रीमंडळात नाहीत. तुम्हाला काहीही दिसेल. जे पाहायचे आहे ते न्यायालय पाहिल,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.