शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहशतवाद विरोधी पथक अमोल शिंदेच्या घरी दाखल

चाकूर : बुधवारी संसदेमध्ये घुसखोरी केलेला अमोल धनराज शिंदे हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील रहिवासी आहे. घटना समजताच त्याच्या घरी दुपारीच दहशतवाद विरोधी पथक दाखल झाले. पथकाकडून त्याच्या घराची कागदपत्रांची व कुटुंबीयांची कसून चौकशी केली जात आहे. त्याने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून हे कृत्य केल्याची चर्चा असली तरी या मागचे खरे कारण तपासाअंतीच उघड होणार आहे.
 
बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी संसदेत प्रेक्षक गॅलरीत उड्या मारून संसदेबाहेर स्मोक कँडल फोडणा-यापैकी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. सदर माहिती समोर येताच लातूर जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले असून तो चाकूर तालुक्यातील झरी (बु.) येथील रहिवाशी असल्याचे कळताच पोलिस व दहशतवाद विरोधी पथक तिथे पोहोचले. अमोलसंबंधी तसेच त्याच्या घरातील कागदपत्रांची त्यांनी पडताळणी सुरू केली असून त्याच्या आई-वडिलांचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान त्याच्या घरासमोर गावक-यांनी व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
 
दरम्यान, अमोल शिंदे याच्या संदर्भात गावात व त्याच्या कुटुंबीयांकडून अधिक माहिती घेतली असता अमोल शिंदे चाकूर तालुक्यातील झरी (नवकुंडाची) येथील एका रोजी रोजगार करणा-या साधारण कुटुंबातील असून त्याचे वडील धनराज बाबूराव शिंदे हे गावातील खंडोबा मंदिरात झाडलोटीचे काम करीत असतात व त्याची आई रोजंदारीवर कामाला जात असते. या अमोल श्ािंदे याचे पहिली ते बारावीचे शिक्षण गावामध्येच झाले असून महाविद्यालयीन शिक्षण चापोली (ता. चाकूर) येथील संजीवनी महाविद्यालयात झाल्याचे त्याच्या भावाकडून समजले. तो स्पर्धा परीक्षा, पोलिस परीक्षा, आर्मीच्या परीक्षा देत होता. ते तीन जण भाऊ असून त्याला एक बहीण आहे. एक भाऊ मंदिराच्या शिखराचे काम करतो तर दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. अमोलने राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवले आहे. सध्या तो सैनिक भरतीसाठी सराव करीत आहे. चार दिवसांपूर्वीच तो मिल्ट्री भरती सरावासाठी दिल्लीला गेला, अशी माहितीही भावाने दिली.