मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2022 (08:24 IST)

बाबरी, संभाजीनगर, राणा, हनुमान चालिसा ते मुंबईचा बाप...देवेंद्र फडणवीसांचं भाषण 7 मुद्यांमध्ये

uddhav devendra
राज्यात सध्या शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. या मालिकेत सध्या थेट सभेतून उत्तर देण्याचा एपिसोड सुरु असून, काल उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जाहीर सभेनंतर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना उत्तर दिलं आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलावर झालेल्या मोठ्या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. या कार्यक्रमात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता आज फडणवीसांनी मुंबईतील गोरेगावमध्ये आयोजित हिंदी भाषिक महासंकल्प सभेतून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
 
1) मास्टर नाही लाफ्टर सभा...
देवेंद्र फडणवीस म्हणाले कालची सभा ही मास्टर सभा नाही तर लाफ्टर सभा होती. संजय राऊत म्हणाले होते शंभर सभांची बाप सभा आहे. हो बरोबर आहे, शंभर कौरव होते, त्यामुळे कालची सभा कौरवांची होती, आजची सभा पांडवांची आहे. काल काही तरी हादरवणारं ऐकायला मिळेल असं वाटलं होतं, मात्र तसं काहीच झालं नाही. राणा दाम्पत्य नादान आहेत. त्यांना माहिती नाही की, हनुमान चालिसेच्या त्या दोन ओळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला माहिती आहे. त्या ओळी आहेत राम दुआरे तुम रखवारे होत आज्ञा बिनु पैसा रे!शिवसेनेला माहिती आहेत. त्यामुळेच यशवंत जाधवांनी पैसा गोळा केला अन् मातोश्रींना लाखो रुपयांचं घड्याळ दिलं.
 
2) औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसीला...
औरंगजेबाच्या समाधीवर ओवैसींनी डोकं टेकवण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, संभाजी राजेंचा खून करणाऱ्या औरंगजेबाच्या समाधीवर ओवैसी जातो अन् माथा टेकवतो अन तुम्ही पाहत राहतात. 'कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की मजार पर, अब जो भगवा लहरायेगा पुरे हिंदुस्तानपर'. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी तलवारी म्यान केल्या, मात्र आम्ही लढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
3) बाबरी पाडायला गेलो, तुरुंगातही राहिलो...
बाबरी पाडायला शिवसैनिक होते, भाजपचं कुणी नव्हतं असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीस म्हणाले माझ्या वजनावरुन त्यांनी टीका केली, सवाल केले बाबरी पाडायला होते का. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी बाबरी पाडायला होतोच, माझ वजन तेव्हा शंभर किलोपेक्षा जास्त होतं. वकील नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेलाही होता आणि तेव्हा जदायुच्या तुरुंगातही होता असं फडवीसांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरेंच्या सत्तेचा ढाचा देखील मी पाडणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
 
4) उद्धव ठाकरे आता संभाजीनगर नाव करण्याची गरज नाही म्हणतात...
काँग्रेसची भाषा आता उद्धव ठाकरे बोलत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या सोनियाजींना दाखवण्यासाठी दिल्या. परमपुजनीय डॉक्टर हेडगेवार यांचं नाव स्वातंत्र्य सेनानींच्या यादीमध्ये नाव आहे हे तुम्हाला माहिती नाही. आणीबाणी लागली होती, तेव्हा तुम्ही कुठे होता? आणीबाणीच्या समर्थनात होता. आता संभाजीनगरच्या नावावरुन देखील सोनियाजींची भाषा उद्धव ठाकरे बोलायला लागले. ते म्हणतात आता संभाजीनगर नाव करण्याची गरज नाही. कारण यांना सोनियाजींना सांगायचं होतं, की मी नाव बदलत नाहीत तुम्ही पाठिंबा काढू नका. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, शिवसेनेने केला खसरा, आता भाजप येईपर्यंत संभाजीनगर नाव विसरा' असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.
 
5) मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही...
काहीही बोलायला नसलं की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं कट असल्याचं हे बोलतात. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, मात्र भ्रष्टाचारापासून मुंबई वेगळी करायची आहे असं फडणवीस बोलले. मुंबईत प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला.
 
6) मुंबईचा अन् महाराष्ट्राचा बाप फक्त शिवाजी महाराज...
काल हे लोक आम्ही मुंबईचा बाप असल्याचं म्हणाले. मात्र तिथे कुणीही बाप नाही...या महाराष्ट्राचा आणि मुंबईचा बाप फक्त शिवाजी महाराज आहेत. मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधानांच्या सभेत मी आयपीएल प्रमाणे बघत होतो. फडणवीस यावर टीका करत म्हणाले की, हा महाराष्ट्राचा आपमान आहे. कारण राज्यात एवढे गंभीर विषय आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे मनोरंजन करत आहेत. 'राजा राज महल से बाहर निकलेगा तबही गरीब का हाल समझेगा' असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
 
7) सकाळचा शपथविधी...
सकाळच्या शपथविधीवरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली. त्यावर फडणवीस म्हणाले माझं सरकार असतं तर त्या मंत्रीमंडळात आम्ही दाऊदच्या साथीदाराला मंत्रीमंडळात ठेवण्या आधी मंत्रीमंडळाला लाथ मारली असती. वाझे सारखे लोक माझ्यासोबत नसते. उद्धव ठाकरे म्हणतात सामनामध्ये सत्य छापून येतं, मग मी त्यांना विचारु इच्छितो की शरद पवार आणि सोनिया गांधींबद्दल सामानामध्ये जे लिहीलं ते खरं आहे का?