1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Bacchu Kadu called off his hunger strike on the seventh day

Bacchu Kadu : बच्चू कडूंनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तसेच विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या बच्चू कडूंनी आज सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. शुक्रवारी अमरावतीचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. त्यांच्या उपोषणातील  मागण्यांची सरकारने गंभीरतेने दखल घेतली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय घेतला जाईल असे म्हटले होते. त्यांनतर आज मंत्री उदय सामंत यांनी या बाबतचे लेखी पत्र दिल्यावर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घेतलं. 
प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागणी घेत त्यांनी हे आंदोलन केले. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना भेटून अन्न त्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती  केली होती. बावनकुळे यांनी तिथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला त्या वेळी फडणवीसांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला.
या वेळी फडणवीसांनी बोलताना म्हटले की शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल आणि समितीमध्ये बच्चू कडू देखील असतील. समितीचा निर्णय आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेता येईल असे आश्वासन दिले होते. समिती स्थापन कधी करण्यात येईल हे जाहीर करण्याची मागणी घेत बच्चू कडू हे आपल्या उपोषणावर ठाम होते. त्यांनतर आज उपोषणाच्या सातव्या दिवशी मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. उदय सामंत पत्र घेऊन आले होते. 
 
उदय सामंत यांनी आणलेल्या पत्रात नमूद केले आहे की, येत्या 15 दिवसांच्या आत कर्जमाफी संदर्भात उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल त्याचा अहवाल आल्यावर कर्जमाफी केली जाईल. असे त्यांनी संगितले. 
या संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून येत्या 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाणार.
अखेर आज सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले असून आता त्यांनी सरकारला कर्जमाफी संदर्भात नवी डेडलाईन दिली आहे. येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगण्यात यावी अन्यथा मंत्रालयात घुसण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.  
Edited By - Priya Dixit 
 
 
पुढील लेख
शनी शिंगणापूर मंदिरातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले,देवस्थानाचा मोठा निर्णय