बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (21:26 IST)

भाजप नेते किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; शिवसेना काय उत्तर देणार?

somayaa
उद्धव ठाकरेंच्या पार्टरनरचे कसाबशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय, २६/११ रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यात अधिकाऱ्यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट बोगस असल्याचेही सोमय्या यांनी म्हणले असल्याने खळबळ उडाली आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कसाबशी व्यावासायिक संबंध होते. नवाब मलिक यांचेही संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात. या सगळ्याचाच अनुभव २६ /११ रोजी झालेल्या हल्ल्यातही दिसून आला. हेमंत करकरे यांना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट हेदेखील बोगस होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे जॅकेट बिमल अग्रवाल यांच्याकडून पुरवण्यात आले होते. यशवंत जाधव यांच्यावर ज्यावेळी धाड टाकण्यात आली त्यावेळीदेखील बिमल अग्रवाल यांचे नाव पुढे आले होते,” असे किरीट सोमय्या म्हणाले. बिमलकुमार अग्रवाल यांना तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर आहेत.
 
समर्थ इरेक्टर डेव्हलेपर्स ही बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव यांची भागीदारीमधील कंपनी आहे. या कंपनीने बद्री प्राईव्हेट लिमिटेड कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी मलबार हिल येथे पुनर्बांधणी प्रोजेक्ट ८० कोटी रुपयांना विकत घेतला. यशवंत जाधव यांची कथा १ हजार कोटींपर्यंत जाणार आहे. समर्थ डेव्हलेपर्स यांचे संबंध उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यासोबत आहेत. तर पाटणकर यांनी बुलेटप्रूफ जॅकेट घोटाळा करणाऱ्या बिमल अग्रवाल यांच्याकडूनच टीडीआर घेतला आहे,” असेही सोमय्या म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटींचे मनी लाँड्रींग केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. “हसन मुश्रीफ यांनी १६ कोटी रुपये शेतकऱ्यांकडून जमा केले आहेत आणि त्या पैशांमधून कारखाना सुरू केला आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. अनिल परबांचंही आता उलटं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. त्यांचं दापोली मध्ये असलेलं रिसॉर्ट पाडण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं आहे. तरीही ते अद्याप पाडण्यात आलेलं नाही. त्यावर आता कोर्टाचा आदेश आल्यानंतरच कारवाई होईल,” असंही सोमय्या म्हणाले.