शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 6 मार्च 2020 (18:11 IST)

भाजपचे 14-15 आमदार संपर्कात; जयंत पाटलांचा दावा

भाजपने मध्य प्रदेशात ऑपरेशन लोट्‌स सुरू केलेले असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे. राज्यातील भाजपचे 14 ते 15 आमदार महाराष्ट्र विकास आघाडीच्या संपर्कात आहेत, असा दावा करतानाच आम्ही मात्र राज्यात सत्तेत असताना भाजपने केलेला खोडसाळपणा करणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
 
मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोट्‌सवरूनही पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी उतावीळ झालेली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. भाजपचे 14 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. आजही हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचे या आमदारांशी चांगले संबंध असून आम्ही त्यांची कामे करणार आहोत. आम्ही त्यांची मानसिकता समजू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
 
आमदार आमच्या संपर्कात असले तरी आम्ही त्यांना गळाला लावणार नाही. भाजपने ज्या चुका केल्या, त्या आम्हाला करायच्या नाहीत. सरकार चालावे यावर आमचा भर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ऑक्टोबर महिन्याता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली होती.