परीक्षांचा बट्याबोळांनंतर आता तरुणांना लसीकरणापासून वंचित ठेवणार
राज्यातील युवाविरोधी ठाकरे सरकारने, देशातील इतर राज्यातील युवक १ मे पासून लस घेत असताना धोरणाअभावी राज्यातील तरूणाला लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. तरुणांना मोफत लस देणार अशी माध्यमामध्ये हवा करणारे सरकार पुन्हा एकदा तोंडघशी..” अशी टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
महाराष्ट्रात लसीकरणाचा तुटवडा अद्यापही कायम असल्याने, १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. यावरून भाजपा प्रवक्ते उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर ट्विटद्वारे टीका केली.
ते म्हणाले, केवळ केंद्राकडे मागण्या करायच्या आणि परवानगी दिल्यावर आता कार्यवाहीला वेळ लागेल असे निमित्त देऊन जनतेला ताटकळत ठेवायचे. मग पुन्हा नवीन कोणत्या तरी मागणीसाठी रडत बसायचे हेच या सरकारचे धोरण आहे.
“१८ वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी व राज्य सरकारला लस खरेदीची परवानगी मिळावी या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या दोन्ही मागण्यांना परवानगी दिल्यावर मात्र, राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे.. असंही केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. आसाम, गोव्यासारख्या राज्यांनी लसीची मागणी नोंदवत असताना मात्र इथे निव्वळ घोषणाबाजी सुरू होती.
लसीच्या अभावी १मे पासून लसीकरण सुरू करता येणार नसल्याचे कारण देत आहेत.जर राज्यसरकारने १८ वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी अशी मागणी केली तर त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी का नाही केली?” असा जाब देखील त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.