Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क- छगन भुजबळ

Updated: बुधवार, 15 मार्च 2017 (16:22 IST)
 
नाशिक जिल्ह्यातील नगरसूल ता.येवला येथील शेतकऱ्यांने कांद्याला भाव न मिळाल्याने आपले पाच एकरातील कांद्याचे उभे पिक जाळून टाकल्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नसल्याची मनाला खंत बाळगत सरकार जर शेतकऱ्याच्या संकटात धीर देऊ शकत नसेल,तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी". अशी याचना डोंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केल्याची घटना नुकतीच घडली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आर्थररोड कारागृहातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वहस्ताक्षरातील पत्र पाठवून या घटनेकडे त्यांचे गांभीर्याने लक्ष वेधून उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्यामुळे कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी स्वहस्ताक्षरातील पत्रात शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राचा संपूर्ण आशय मांडून राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत सविस्तर परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात मांडली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम आपण राज्यात नुकत्याच झालेल्या मनपा व जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळविले त्याबद्दल अभिनंदन. परंतु त्याचबरोबर माझ्या विधानसभा क्षेत्रातील नगरसूल (ता.येवला,जि.नाशिक) येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी आपल्याकडे एका पत्रान्वये इच्छामरणाची परवानगी मागितल्याची हृदयद्रावक बातमी नुकतीच वर्तमानपत्राद्वारे समजली आणि मन सुन्न झाले असल्याचे म्हटले आहे.
 
सदर गंभीर बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी भुजबळ यांनी शेतकरी कृष्णा डोंगरे याच्या पत्रातील व्यथा मांडली आहे. शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी म्हटले आहे की, "कधी दुष्काळ,तर कधी गारपीट,कधी कोसळलेले शेतमालाचे बाजारभाव यामुळे मी व माझे कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यात गतवर्षी येवले तालुक्यात दुष्काळ पडल्याने पोटा-पाण्यासाठी कन्नड तालुक्यात जाऊन भाड्याने जमीन घेऊन आठ एकर उन्हाळ  कांदा लागवड केली. निसर्गाच्या कृपेने कांदा पिक चांगले येऊन उत्पादनही १०० टक्के निघाले. निघालेला  कांदा चाळीत साठवणुक करून बाजारात विक्री करण्यासाठी ठेवला,परंतु कांदा बाजारात नेण्यापूर्वीच कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने संपूर्ण कांदा हा चाळीतच सडला व माझे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यंदा पाउस चांगला झाल्याने मी नगरसूल येथे कांद्याचे उत्पादनासाठी एका खाजगी फायनान्स कंपनीचे दिड लाख रुपयांचे कर्ज काढले,उधार उसनवारी केली,घरातील महिलांचे दागिने मोडले. अशा सर्व मार्गाने पै-पैसा जमा करून कांद्याचे उत्पादन घेतले. त्यातून पिक उत्तम आले. परंतु शासनाच्या आडमुठेपणामुळे कांदा पिकाचे दर घसरल्याने माझा किमान उत्पादनखर्च देखील फिटेनासा झाला. डोक्यावर वाढलेले कर्ज फेडायचे कसे ? असा यक्ष प्रश्न आमच्या पुढे उभा आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने वैतागून काढणीला आलेले पाच एकर कांदा पिक स्वतः जाळून टाकले. इतके घडूनही राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एकही पदाधिकारी धीर देण्यासाठी आला नसल्याची मनाला खंत बाळगत सरकार जर शेतकऱ्याच्या संकटात धीर देऊ शकत नसेल,तर मला इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्यावी". अशी याचना डोंगरे यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.
 
यावर छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मुलाप्रमाणे वाढविलेल्या उभ्या कांदा पिकाला छातीवर दगड ठेऊन स्वतःच्या हाताने आग लावली. कुटुंबातील सदस्याला अग्निडाग देण्यासारखं अघोरी आणि दुर्देवी असं धाडसी कृत्य होतं ते. कारण आपल्या उभ्या पिकाची नुकसान शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही. श्री.डोंगरे यांनी केलेली घटना व व्यक्त केलेली इच्छामरणाची याचना ही केवळ प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. आज प्रत्येक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे. ते नाईलाजाने आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
 
सतत काबाडकष्ट करून शेती पिकवणारा शेतकरी अतिशय स्वाभिमानी आहे. त्यांना सरकारकडून काहीही उपकार नको आहे. त्यांना हवा आहे त्यांच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारीत रास्त हमी भाव! तो तुम्ही देवू शकत नाही म्हणून त्यांना कर्जमाफीसाठी क्षमा याचना करावी लागत आहे.
 
निसर्गाकडून होणारा अन्याय  म्हणजे 'अस्मानी' आणि सरकारकडून केला जाणार अन्याय म्हणजे 'सुलतानी' अशा दुहेरी संकटांना शेतकरी वर्षानुवर्षे तोंड देत आहे. कधी दुष्काळ-नापिकी तर कधी पाणी असूनही विजेच्या अडचणी. यातूनही कशीबशी पिकं हाताशी आली तर गारपीट किंवा बेमोसमी पाउस आणि याही संकटातून वाचून चांगला शेतमाल निघाला तर त्याला मिळणारा कवडीमोल भाव. या दृष्ट चक्रात अडकलेला राज्यातील शेतकरी अतिशय कठीण प्रसंगांना तोंड देत आहे. शेतकरी वर्ग पुरता खचला आहे.  आज त्याला गरज आहे आपल्या आधाराची.
 
'शेतकऱ्यांना कर्जमाफी  देण्याऐवजी  ते कर्जबाजारी होणार नाही यासाठी उपाययोजना करणार'. असं आपण नेहमी म्हणता. वर्षानुवर्षे जर उत्पादनखर्च सुद्धा निघत नसेल तर शेतकरी कर्जबाजारी होणे स्वाभाविक आहे. आणि यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादनखर्चावर आधारीत हमी भाव.  आणि तो जर आपण देवू शकत नसाल तर त्यांना कर्जमाफी देणे हा त्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांना भिक नको.  त्यांना हवीय हक्काची कर्जमाफी. ती जर देणार नसाल तर हा शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय काहीच पर्याय नाही असे त्यांनी म्हटले आहे.
 
सरकार हे मायबाप असते. त्यांना आता गरज आहे मायबाप सरकारच्या आधाराची. आपनांसारखे संवेदनशील असलेले मुख्यमंत्री आणि आपले आपले सरकार श्री कृष्णा डोंगरे यांच्यासह राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या व्यथांचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो असे छगन भुजबळ यांनी शेवटी म्हटले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वे १ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय ट्रेन्ससाठी सुधारित वेळापत्रक लागू करत आहे

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली, मुंबईत आयसीयूमध्ये दाखल

पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू होणार, ६ नवीन लोकल ट्रेन्स आणि एसी लोकल ट्रेन्सची संख्याही वाढणार

टीम इंडिया सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments