मराठा आरक्षणाला कुठलाच विरोध नाही : भुजबळ
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही. मात्र, अस्तित्वात असलेल्या एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावू नये, अशी आमची आग्राही भूमिका आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा राज्यघटनेने घातलेली नाही, तर ती न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवून कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जावे, अशी भूमिका माजी मंत्री छगन भूजबळ यांनी स्पष्ट केली आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पुण्यातील महात्मा फुले वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर छगन भुजबळ प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असल्याचे काही लोक चुकीच्या पद्धतीने समाजात पसरवत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कसलाही विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच आमची भूमिका आहे. ओबीसींना ५२ टक्के आरक्षण आहे, असा गैरसमज पसरविला जात आहे. ओबीसी प्रवर्गातील ४०० जातींना केवळ १७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी व इतर मागास प्रवर्गांना मिळणार्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जावे, असेही भुजबळ यांनी सांगितले.