मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जुलै 2020 (09:11 IST)

ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही : मुख्यमंत्री

“मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते. ती भीती त्यांनी मनातून काढून टाकावी. मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. याबाबत ओबीसी समाजाच्या शंका कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल (महाधिवक्ता) यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
 
ओबीसींच्या प्रश्नांची दखल मी यापूर्वीही घेतली आहे. आपण मिळून कामही सुरु केले होते. अर्थसंकल्पातून चांगली स्वप्ने राज्यासाठी घेऊन आलो असतांना कोरोनाचे संकट आले आहे. पण असे असले तरी ओबीसी समाजाचा एकही प्रश्न किंवा मुद्दा सोडून देणार नाही. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. विचारपूर्वक, कायमस्वरूपी ठोस निर्णय घेण्याचे मी वचन देतो. ओबीसी समाजाला न्याय देणारच. ठामपणे एकेक पाऊल पुढे टाकत जात आहोत. सरकारवर, माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.