1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (08:44 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे केली विठ्ठलाची महापूजा

ashadhi ekadashi pandharpur mahapuja by CM uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. करोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडला.
 
मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मानाचे वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत ही शासकीय पूजा पार पडली. तसेच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित होते.
 
पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे हे दांपत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते.
 
ही महापूजा संपन्न झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केलं त्यात ते म्हणाले, मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?
 
म्हणून मी साकडं घातलं आहे, आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचे संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो असे मी विठुरायाच्या चरणी साकडं घातलेलं आहे, मातेच्या चरणी साकडं घातलेलं आहे, असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.