उत्तर भारतातून शीतलहरी, तर दक्षिणेकडून बाष्पयुक्तवारे यांचा संगम राज्यात किमान तापमानात घट
उत्तर भारतातून शीतलहरी, तर दक्षिणेकडून बाष्पयुक्तवारे यांचा संगम महाराष्ट्रावर होत असल्याने राज्यात किमान तापमानात फार घट झालेली नसतानाही उत्तररात्र ते पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. सोमवारी तामिळनाडूतील थुथुकुडी गावात 950 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस 24 तासांत झाला आहे. उत्तरेकडील राज्ये गारठली असून पंजाब, हरियाणा, चंडीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि वायव्य राजस्थान, पूर्व-मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. त्यामुळे त्या भागात दाट धुके आणि कडाक्याची थंडी आहे. तमिळनाडू राज्यातील थुथुकुडी येथे तब्बल 950 मिलिमीटर तर तिरुनेलवेली येथे 620 मिलिमीटरची नोंद झाली आहे.
लक्षद्वीप बेटांवर वा-याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने कोमोरिन परिसरात वा-याचा वेग वाढला आहे, त्यामुळे पुन्हा वादळी वारे सुरू झाल्याने समुद्र खवळणार आहे. उत्तर भारतात पुढील पाच दिवस कडाक्याच्या थंडीसह दाट धुके राहणार आहे. तर दक्षिण भारतात पाऊस सुरूच आहे. त्या दोन्ही वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होत आहे. दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे तर उत्तर भारतातून येणा-या शीतलहरींची टक्कर राज्यात होत आहे. त्यामुळे किमान तापमानात फार वाढ झालेली नसतानाही थंडीचा कडाका कायम आहे.
तामिळनाडूत 3 ठार
गेली दोन दिवस तामिळनाडू राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पाऊस आणि पुरामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान , रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे 800 प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणा-या ट्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.
प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
गेल्या 24 तासांत सुमारे670 मिमी आणि 932 मिमी पावसामुळे तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक स्थानके जलमय झाली आहेत. सुमारे 800 प्रवासी तिरुचेंदूर आणि तिरुनेलवेली स्थानकांदरम्यान धावणा-या ट्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांना स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. दोन टीम अडकलेल्या रेल्वे प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत असे एनडीआरएफने म्हटले आहे.
अनेक जिल्ह्यांत मुसळधार
हवामान खात्याने म्हटले आहे की तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारीही हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो. चेन्नई हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील तीन तासांत तामिळनाडूच्या कराईकल आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. मुसळधार पावसाची अपेक्षा असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुदुकोट्टई, तंजावर, तिरुवर, नागापट्टिनम, रामनाथपुरम आणि शिवगंगाई यांचा समावेश आहे. थेनी, तेनकासी, कन्याकुमारी, थिरुनेलवेली, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रस्त्यांचा संपर्क तुटला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून अनेक निवासी वसाहती पाण्याखाली आल्या आहेत. तलावांना तडे गेल्याने आणि पूर आल्याने अनेक भागातील रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी मोबाईल फोन सेवाही विस्कळीत झाली आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor