बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 डिसेंबर 2016 (15:50 IST)

नागपूर देशाची क्राईम कॅपिटल होण्याची भीती - धनंजय मुंडे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे यांनी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी नागपूरच्या बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेबाबात सभागृहाचे लक्ष वेधले. नागपूरात खून, बलात्कार, दरोडा अशा गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागपूर उद्या देशाची क्राईम कॅपिटल होऊ नये अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी आधी मुंबई शहराला हादसो का शहर म्हणून ओळखले जायचे आता नागपूरची परिस्थिती पाहता नागपूरसाठी नवीन गाणे शोधावे असे म्हणत राज्याचा मुख्यमंत्र्यांचा आपल्या खात्यावर आणि विभागावर दबदबा राहिलेला नाही असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लागावला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईत नाईट लाईफबाबत चर्चा होत असताना नागपूरात नाईट लाईफ जोरात चालू आहे. नागपूरात पहाटेपर्यंत बार चालू असतात, सेक्स रॅकेट सुरू असतात, बेकायदेशीर शस्त्र सर्वात जास्त नागपूरात मिळत आहेत. ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच राज्यात सुरक्षित नाहीत. सत्ताधारी पक्षाचेच आमदार पोलिसांवर हल्ले करत आहे असेही मुंडे म्हणाले. जनतेचे एखादे आंदोलन झाले तर सरकार पोलिसी बळ वापरून ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने फिरत आहेत. महिलांवरील अत्याचारातही वाढ झाली आहे येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचाराबाबतची बातमी ऐकायला मिळते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी गुन्हे नोंद करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे अशी माहिती सभागृहाला दिली होती मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दावा साफ खोटा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्यात २०१५ साली ४ लाख २३ हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली तसेच महिलांवरील अत्याचारांची संख्या ३१ हजार १२६ वर पोहोचली असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील मागावर्गीयांवरील ह्ल्ल्यांच्या संख्यातही वाढ झाली असून सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य बनले आहे. दंगलींच्या प्रकरणात राज्याचा बिहारनंतर दुसरा तर अपहरणात उत्तर प्रदेशानंतर दुसरा नंबर लागतो अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. राज्याची परिस्थिती अशी गंभीर असताना राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.