शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (17:10 IST)

आरक्षणाला विरोध करणारे धनगर समाजाला काय आरक्षण देणार - धनंजय मुंडे

- आरक्षणाच्या लढाईत समाजाच्या खांद्याला खांदा देऊन लढेन, मुंडे यांनी दिली ग्वाही

ज्यांच्या इशाऱ्यावरून राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकार चालते त्या नागपूरच्या संघ कार्यालयातून प्रत्येक १५ दिवसाला देशातील आरक्षणे संपवण्याची भाषा केली जाते. जे आरक्षण संपवण्याची भाषा करतात ते धनगर समाजाला काय आरक्षण देणार, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे  यांनी केला आहे.
 

परभणीच्या खंडोबा बाजार मैदान परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने धनगर समाजाची चार वर्षांपासून फसवणूक केली आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची घोषणा करणा-यांना २०० बैठका होऊनही आरक्षण का देता आले नाही असा सवाल उपस्थित करतानाच आरक्षणाच्या या लढाईत मी धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून सर्वात पुढे असेल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची सरकारची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही तर त्यांनी समस्त मानवजातीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ एका समाजाने न करता सर्व समाजाने एकत्र येऊन करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार  बाबाजी दुर्रानी , आमदार राहुल पाटील, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, विठ्ठलराव रबदाडे, प्रा. शिवाजी दळणकर, डॉ. विवेक नावंदर, दिनेश परसावत, संयोजक मारोतराव बनसोडे मामा आदी उपस्थित होते.