शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (20:10 IST)

नाशिक जिल्ह्यातील सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु

Discharge of water
नाशिक जिल्ह्यात  झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याकडे सुमारे एक लाख क्युसेेस पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये दारणा धरणातून ९६ हजार १०७ , गंगापूर धरणातून १२ हजार ४५८, करवा धरणातून ९  हजार ९०८ भोजापुर धरणातून ४१६  आळंदी धरणातून १ हजार १५३ तर वालदेवी धरणातून ३ हजार ४८१ पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे.  कालच्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहे. आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याच्या दिशेने सुमारे एक लाख क्युसेस पाणी एक जून पासून २१ सप्टेंबरपर्यंत सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
शुक्रवारी  जिल्ह्यात सुमारे २९  मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, पावसामुळे गोदावरीला दुसऱ्यांदा पुर आला असून, मोदकेश्वर मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी आले आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात शहरासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काही भागातील नागरिकांच्या घरात देखील पाणी गेले आहे. घोटी बाजारपेठेमध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी साचले आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणासह इतर धरणात पाण्याची पातळी वाढली आहे.