1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (08:49 IST)

मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्राचाळवासियांना भावनिक साद

Don't sell the houses you got - Chief Minister Uddhav Thackeray's emotional appeal to the people of Patrachal
अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे, हे हक्काचे घर मिळविण्यासाठी जो संघर्ष केला आहे, तो विसरु नका आणि हा संघर्ष वायादेखील जाऊ देऊ नका, त्यासाठी मिळालेली ही घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासियांना घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ  करण्यात आला.
 
पत्रा चाळ हा विषय अनेकांच्या माहितीचा आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न रखडला होता, आंदोलने, उपोषणे झालीत आणि अखेर हा प्रश्न आज मार्गी लागला आहे, हा क्षण पहायला पत्राचाळीतील जे रहिवासी आज हयात देखील नाहीत,  त्यांना मी अभिवादन करतो. पत्राचाळीचा प्रश्न सोडविण्याची मागणी घेऊन संघर्ष समितीला दिलेले वचन आज पूर्ण केले असून अडचणी दूर करून प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त आज होत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. कॅबिनेटमध्येही या विषयाला त्यांनी नेहमी वाचा फोडली असे सांगून कामं अनेक असतात, मुंबईत हक्काच घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यादृष्टीनं आजचा शुभ दिन आहे. चिकाटी आणि जिद्द असली की काही करता येते, हे या कामातून दिसते. अनेकजण पोटापाण्यासाठी मुंबईत येत असतात. त्यांचे किमान हक्काचं घर असावे असे स्वप्न असते. ते स्वप्न या कामाच्या निमित्तानं पूर्ण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
म्हाडा सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पाविषयी….
 
मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागणार आहे. ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची  सदनिका मिळणार आहे. म्हाडा स्वतः विकासक म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे काम करीत आहे.
 
प्रलंबित सदनिकांच्या बांधकाम योजनेची ठळक वैशिष्ट्ये-
 
६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका
व्हिट्रीफाईड फ्लोअरिंग टाईल्स
ग्रेनाईट किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह
ऍल्युमिनियम स्लायडिंग खिडक्या
बाथरूम व टॉयलेटमध्ये फुल हाईट सिरॅमिक टाईल्स
बाथरूममध्ये मिक्सर कॉक
प्लास्टिक इमल्शन पेंट (आतील भागास)
अक्रेलिक पेंट (बाहेरील भागास),
बाल्कनीस स्टेनलेस स्टील रेलिंग, टफन ग्लाससह
अग्निप्रतिरोधक फ्लश दरवाजे
अद्ययावत लिफ्ट
बेसमेंट व पोडियम पार्किंगची सुविधा