1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2023 (14:34 IST)

पालेभाज्या महागल्याने ग्राहकांचा मोर्चा कडधान्यांकडे…..रिपोर्ट !

सध्या देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत उत्तर भारतात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. पावसामुळे पालेभाज्या सडत आहेत.

परिणामतः आवक कमी झाली असून, भाजीपाला चांगलाच भडकला आहे. भाजी करायची म्हटले तर गृहिणींचे टोमॅटोविना अजिबात भागत नाही. खरं तर टोमॅटोशिवाय भाजीला चवच येत नाही. मात्र सध्या टोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यासोबतच भाजीपालाही महागल्याने बहुतांश ग्राहक कडधान्यावर भर देत, दुधावरची तहान ताकावर भागवित असल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे.
 
दरम्यान पालक, मिरची, सांबार, वांगे, फुलकोबी, पानकोबी, भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, शिमला मिरचीसह जवळपास सर्वच हिरव्या भाज्या महागल्या आहेत. मात्र सर्वाधिक भाव सध्या टोमॅटो खात आहेत. त्याच्या जोडीला अद्रकही भाव खात असून २८० रुपये किलो असा दर आहे.
 
बाजाराचा फेरफटका मारला असता, टोमॅटो १०० ते १२० रुपये प्रती किलो विकले जात आहेत. एरवी एक किलो खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलोवर, तर अर्धा किलोवाले एका पावावर आले आहेत. आमचूर पावडर व लिंबू पर्याय म्हणून वापरू लागले आहेत.
 
दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाला महागतो. मात्र यंदाही जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत निम्म्या भाजीपाला खरेदी करुनच लोक आपला व्यवसाय चालवत आहेत. अनेकजण महागड्या भाज्या खरेदी न करता कडधान्य, सोयाबीन, राजमा, बटाटे इत्यादींचा वापर करुन आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजीपाला आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी आपला मोर्चा चना, तूर, मूग, उडीद, मसूर, कुळीथ, मटकी, बरबटीच्या डाळींसह चवळी, सोयाबीन, वटाणा या कडधान्याकडे वळवला आहे. आलू, कोहळे व अन्य एक-दोन भाज्यांचा अपवाद वगळता सध्या बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलोवर गेल्या आहेत. एवढ्या महाग भाज्या खरेदी करण्याची गोरगरिबांची हिंमतच होत नाही. भाजीपाला महाग झाल्यापासून असंख्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर कडधान्य खरेदी करीत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor