बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (15:28 IST)

ईडी हे सोडून गेलेल्या लोकांच्या जाण्याचं कारण नाही- शरद पवार

sharad pawar ajit pawar
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले.
 
या सगळ्या घडामोडींनंतर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कऱ्हाडला गेले. तिथे त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.त्यावेळी ते म्हणाले, "शाहू-फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या पक्षाला धक्का देण्याचं काम करण्यात आलं आहे. जातीय विचारधारा असलेल्यांकडून देशाचा कारभार पुढे नेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उलथापालथ करण्याबद्दची भूमिका याच प्रवृत्तींनी घेकली. दुर्दैवाने आमच्यातले काही सहकारी त्यांना बळी पडले.
 
फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील पण महाराष्ट्रातील शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही, तसंच उलथापालथ करणाऱ्या शक्तीला योग्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
ईडी हे सोडून गेलेल्या लोकांच्या जाण्याचं कारण नाही -शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमचे अनेक सहकारी ज्यांना कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी पक्ष मजबूत करावी अशी अपेक्षा होता. भाजपाकडून आज वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या सगळ्यांश संघर्ष करून पुढे जाण्याची अपेक्षा आमच्या सहकाऱ्यांकडून आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली. नवीन लोकांनी नाऊमेद होऊ नये. त्यासाठी मी हा दौरा सुरू केला. मी इथे येईपर्यंत फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. मी हेच चित्र सगळीकडे पाहिलं. आम्ही तरुणांना योग्य मार्गदर्शन केलं तर दोन तीन महिन्यात राज्यात चित्र वेगळं दिसेल. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. ज्यांनी आमच्या आयुष्यातक गुरुची भूमिका निभावली त्यांना स्मरण करून ही सुरुवात केली.
 
पुन्हा एकदा पक्ष मजबूत करायला उभा राहील आणि त्याच मोहिमेची सुरुवात आम्ही आजपासून केली आहे. अजित पवार परके नाही पण आम्ही एकत्र काम केलं आहे. जयंत पाटील विधिमंडळ नेते आहेत. त्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर त्यांनी घेतला असेल. जो घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल.
 
आणीबाणी जेव्हा जाहीर झाली तेव्हा अनेक राजकीय पक्षांनी इंदिरा गांधीवर हल्ला केला. तेव्हा फक्त बाळासाहेबांनी इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. नंतर झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज काही फार वेगळं झालं नाही. काही लोक सोडून जातात काही लोक येतात, मला याची सवय आहे. आज जे लोक होते त्यापैकी बहुतांश लोक तरुण होते. माझा विश्वास सामान्य माणूस आणि मतदारांवर आहे.
 
9 मंत्री वगळता सर्वांना आमची दारं खुली- जयंत पाटील
अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
येत्या 5 जुलै रोजी पवारसाहेबांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, पवारसाहेबांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.
 
आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. 9 आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असंही ते म्हणाले.
 
ज्याक्षणी 9 आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
 
अनेक आमदार आम्हाला फोन करत आहेत. बंडखोरांना पवारांच्या विरोधात जाणं ही भीती वाटते, आव्हाड यांनी सांगितलं आहे. आम्ही 9 जणांविरोधात अपात्रतेची नोटीस दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधीपक्षनेतेपदावर काँग्रेसकडूनही दावा होत असल्याचं म्हटल्यावर ते म्हणाले, "आमचा बळी गेला तरी चालेल पण आम्हाला महाविकास आघाडी कायम ठेवायची आहे." 5 जुलै रोजी आम्ही सभा घेणार आहोत. तेव्हा महाराष्ट्रातील नेत्यांची पहिली फळी शरद पवारांबरोबर असेल याची मला पूर्ण खात्री आहे असं आव्हाड म्हणाले.
 
खासदार अमोल कोल्हे काल शपथविधीला हजर होते. आज मात्र आपण साहेबांबरोबर असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
 
सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही- राज ठाकरे
महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते दिवसेंदिवस किळसवाणं होत आहे. त्यांना मतदारांशी काही घेणं देणं नाही. मतदार का होते याचा विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी जी तडजोड करताहेत ते महाराष्ट्राच्या जनतेने गांभीर्याने घ्यावं.
 
पवार साहेबांचा पाठिंबा असल्याशिवा दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे असंच जाणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
 
मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे याची कल्पना नव्हती- नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील
राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी हे पाऊल आम्ही उचललं आहे. आमच्यासोबत आज 35 आमदार होते. बाकी आमदार फोनवर संपर्कात आहेत. 45-47 आमदार सोबत असतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.
 
हे सगळं कधी ठरलं याबद्दल बोलताना ते म्हणाले, "कधी ठरलं हे अजितदादा सांगतील. मी काल वाराणसीला गेलो होतो. मला रात्री फोन आला की सकाळी 10-11 पर्यंत पोहोचायचं आहे. मला राजभवनाला यादी पाहिल्यावर कळालं की आपला शपथविधी आहे. सगळे आमदारही अनभिज्ञ होते. आम्ही सरकारमध्ये सामील होणार हे माहिती नव्हतंमाझ्या जीवनामधला अविश्वसनीय प्रसंग होता. संघटनेचं काम असेल म्हणून दादांनी बोलवलं असेल म्हणून मी आलो. मी त्यांच्या घरी पोहचल्यावर ही त्यांनी काही सांगितलं नाही. तिथून थेट ते राजभवनात घेऊन गेले.राजभवनावर गेल्यावर कळलं की शपथ घ्यायची आहे."
 
शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, "शरद पवार यांना कल्पना होती की नाही हा माझा भाग नाही. मी यावर बोलणार नाही. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. या गोष्टीत त्यांना माहिती आहे की नाही याची मला कल्पना नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहिला पाहीजे हे आमचं प्राधान्य राही. पवार साहेबांच्या नेतृत्त्वात काम करावं हीच इच्छा आहे."
 
- दुसऱ्या पक्षात जाणार की पक्ष विलिन करणार याविषयी बोलताना ते म्हणाले, "आज याविषयीची चर्चा करण्यात पॉईंट नाही. पक्ष एकसंघ राहिला पाहिजे हीच आमची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वमान्य नेत्याने नेतृत्व करावं ही आमची इच्छा. आम्ही घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू."
 
अजितदादा नाराज आहेत हा शब्द वापरण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित कशात आहे, ह्या दृष्टीने हे पाऊल उचललं आहे. असंही ते या मुलाखतीत म्हणाले.
 
ही संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता.
अजित पवारांबद्दल मी भावनिक आहे- रोहित पवार
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहता मतदारांचंचं मत असं पडलंय की आजचं राजकारण गलिच्छ झालंय. त्यामुळे मत देऊन चुक केली की काय असं त्यांना वाटू लागलं आहे. आम्ही राजकारणात येऊन चूक केली की काय असं माझ्यासारख्या नवीन आमदारांना वाटायला लागलंय. अजित पवारांबद्दल मी भावनिक आहे. ते माझे काका आहे. अनेकदा त्यांनी मला मदत केली आहे.
 
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे. ते जी दिशा देतील त्या दिशेने आम्ही नक्कीच जाऊ असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
 
ही तर भाजपची पर्यायी व्यवस्था- संजय राऊत
एकनाथ शिंदे अपात्र ठरणार म्हणून ही पर्यायी व्यवस्था भारतीय जनता पक्षानं केली. त्यांना आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींनाही आता कळून चुकलंय की शिंदे आता अपात्र ठरणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदावर अजित पवारांना बसवण्याचं काम काल झालेलं आहे. नागालँडची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार नागालँडला जाऊन मुख्यमंत्री झालेले नाही.
 
अजित पवारांच्या या निर्णयावर मी बोलणार नाही, भाजप आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठीच करार झाला आहे. महाराष्ट्रात चिता जळत असताना हे लोक पेढे वाटत होते. 24 तासही ते थांबू शकले नाही. कालपर्यंत पवार काही लोकांचे गुरू होते मात्र त्यांनी पवारांशी बेईमानी केली, तसंच शिंदे अपात्र ठरणार हे निश्चित झालं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
माझ्यासाठी दादा कायम दादाच राहील- सुप्रिया सुळे
अजित पवारांचा शपथविधी झाल्यावर काल (2 जुलै) रात्री उशिरा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
 
त्या म्हणाल्या, "संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आपल्याकडे नाउमेद होण्याचा एक मार्ग असतो किंवा आपल्या समोर एक प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्यातून नव्या उर्जेने नवा मार्ग काढायचा आहे (असा दृष्टीकोन असू शकतो.)" "ही जी घटना झालेली आहे ती आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे, आणि त्याची काही कारणं असतील, त्याबदद्ल पवार साहेब सविस्तर बोलले आहे. आता नव्या उमेदीने संघटना उभी करणं हे आमचं ध्येय आहे."
 
अजित पवारांशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल त्या म्हणाल्या की, "प्रोफेशनल लाईफ आणि खाजगी नाती यात गल्लत करू नये एवढी मॅच्युरिटी मला आलेली आहे. माझ्यासाठी दादा कायम दादाच राहील.
 
सत्ता असतानाही अजित पवारांची आणि इतर पक्षातल्या आमदारांची भाजपला गरज का वाटली असावी याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "सत्ता असतानाही त्यांना कदाचित आत्मविश्वास नसावा की आपण निवडणुका जिंकू शकू."
 
"विरोधी पक्षातल्या लोकांवर इन्कमटॅक्स, सीबीआय किंवा इडीच्या केसेस दाखल केलेल्या आहेत. तुमच्याच पैकी एका पेपरमध्ये आरटीआयच्या माध्यमातून माहिती समोर आली होती की अशा केसेस दाखल झालेल्या राजकीय पक्षांशी संबंधित लोकांपैकी 95 टक्के लोक हे विरोधी पक्षातले आहेत. या संस्थांच्या मागे एक अदृश्य हात आहे. या संस्थांचा वापर विरोधी पक्षांच्या विरोधात केला जातो हे तुम्ही सतत चॅनलवर आणि पेपरवर सांगत असता."
 
तुम्ही आता अजित पवारांबरोबर आहात की शरद पवारांबरोबर असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "या पक्षाचा आश्वासक चेहरा शरद पवार आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत. दुसरं कोणासोबत आहे की नाही हा पर्यायच मला उपलब्ध नाही."
 
एक प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होईल का असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "पवार साहेब ठाम राहून लढताहेत, या गोष्टीने उलट आमची विश्वासार्हता वाढेल."
 
एकनाथ शिंदेंनीही बंड केलं होतं, आता अजित पवारांनी केलं, मग अजित पवारांनाही गद्दार म्हणणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "ते झालं ते वेगळं होतं आणि हे झालं ते वेगळं."
 
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेतसाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार का हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "आताशी गोष्टी घडत आहेत, पुढे काय होईल ते बघू."
 
आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका
याच पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मी पवार साहेबांसोबत होतो आणि पवार साहेबांसोबतच राहाणार."
 
जयंत पाटील यांनी माहिती दिली की, आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केलेली आहे. "त्यांना इमेलवर प्रत पाठवलेली आहे. तसंच प्रत्यक्ष कॉपी काही तासांत त्यांना मिळेल. मी त्यांच्याशी स्वतः चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना व्हॉट्सअपवरही मेसेज केला आहे. उद्या सकाळी लवकरात लवकर त्यांनी अपात्रतेवर आमची बाजू ऐकून घेण्यासाठी विनंती केलेली आहे. तसंच निवडणूक आयोगालाही याबद्दल कल्पना दिलेली आहे.
 
आम्ही त्यांना हेही सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व रँक आणि फाईलमधले राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बाजूने आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांतले कार्यकर्ते पवार साहेबांच्या समर्थनार्थ बाहेर आलेले आहे. नऊ आमदार म्हणजे पार्टी असू शकत नाही. त्याबद्दल राष्ट्रवादी पक्ष तातडीने कायदेशीर पावलं उचलत आहे."
 







Published By- Priya Dixit