मनसेच्या दीपोत्सवात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र दिसणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत मुंबईतील शिवाजी पार्क परिसर शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून लख्ख दिव्यांनी उजळून टाकला जातो. यंदाही मनसेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र दिसणार आहे.
दरवर्षी मनसेच्या वतीने दिवाळी निमित्त दादर शिवाजी पार्क परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमाचा शुभारंभ 21 ऑक्टोबर म्हणजे आज होणार आहे. या कार्यक्रमास राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या कार्यक्रमाबाबत राज ठाकरे यांची स्वाक्षरी असलेले पत्र शिवाजी पार्क, दादर परिसरात मनसेच्या वतीने वाटण्यात आले आहे.
या पत्रात मनसेच्यापदाधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमाला मुंबईतील सर्व विभाग अध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष, महिला-पुरुष पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिकांनाही कुटुंबासह या दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच दिवाळीनिमित्त सर्वांनी आपलं घर, अंगण रोषणाईने उजळून टाकावे असेही सांगण्यात आले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor