गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2017 (15:35 IST)

मिशन दोन हजार कोटी'चे लक्ष्य साध्य करा

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून दरमहा दोन हजार कोटी रुपयांचा महसूल वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या दहासूत्रीचा उपयोग केल्यास येत्या तीन ते चार महिन्यात हे लक्ष्य साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करत कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे यांनी लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

कोकण प्रादेशिक विभागाच्या प्रादेशिक संचालक पदावर नियमित नियुक्ती झाल्यानंतर श्री. सतीश करपे प्रथमच नाशिक परिमंडळाच्या दौऱ्यावर आले होते. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या (एकूण 13 विभाग) कामांचा सलग तीन दिवस स्वतंत्रपणे बैठका घेऊन त्यांनी आढावा घेतला. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर, संबंधित ठिकाणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी या बैठकांना उपस्थित होते. कोकण प्रादेशिक विभागात नाशिक, कल्याण, भांडूप व रत्नागिरी या चार परिमंडळांचा समावेश असून कल्याण येथे मुख्यालय आहे. या बैठकांमध्ये मार्गदर्शन करतांना श्री. करपे म्हणाले, 'मिशन दोन हजार कोटी' अंतर्गत कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दोन हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पुढील दहा सूत्रांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. तातडीने दखल घेऊन खंडित वीजपुरवठा सुरळीत करणे, नवीन वीज जोडणी तात्काळ देणे, वीजबिलाची संपूर्ण वसुली, अचूक व शंभर टक्के बिलिंग, गळती कमी करून परिमंडळात आलेल्या प्रत्येक युनिट विजेची विक्री व बिलिंग, मोबाईल ऍप्सचा अधिकाधिक वापर, ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण, रोहित्र बाद होण्याचे व अपघाताचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणणे, मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे व विजेच्या विक्रीत वाढ या दहासूत्रीचा उपयोग केल्यास 'मिशन दोन हजार कोटी'  सहजसाध्य आहे. वितरित झालेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे पैसे त्याच महिन्यात शंभर टक्के वसूल करणे तसेच जुन्या थकबाकीचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याच्या सूचना श्री. करपे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यातून येत्या तीन ते चार महिन्यात 'मिशन दोन हजार कोटी'चे लक्ष्य साध्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  करपे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करण्याची ग्वाही या बैठकांमध्ये दिली.