रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (22:58 IST)

एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करा : मुख्यमंत्री

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. “एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी.”, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. “मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे  ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करा.”, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.