शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सातारा , शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (14:59 IST)

कीर्तनकार बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. तसंच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला होता. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
आता पोलीस बंडातात्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्यातल्या पिंजर येथील बंडातात्या यांच्या मठात सातारा पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे.
 
प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्रीधोरणाविरोधात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. होतं.