शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 मार्च 2024 (09:15 IST)

जी. एन. साईबाबांची जन्मठेप रद्द

In the case related to Naxalites
नक्षलवाद्यांशी संबंधित प्रकरणातील जी. एन. साईबाबा खटल्याचा निकाल आला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींना निर्दोष सोडले आहे.
 
साईबाबा व अन्य साथीदारांनी दाखल केलेल्या अपिलावर सात सप्टेंबर २०२३ रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखीव ठेवला होता. आता निकालात जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे. या प्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला दहा वर्षे कारावास तर अन्य सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि पोलिस दलाला मोठा झटका आहे.
 
एका आरोपीचा मृत्यू
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साईबाबा यांनी दाखल केलेल्या अपिलावर बहुप्रतीक्षित निर्णय आज जाहीर केला. या प्रकरणात शिक्षा झालेल्या जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची सुटका केली आहे. या प्रकरणात त्यांचा अन्य एक साथीदार पांडू नरोटे याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला होता.
 
निकाल देताना काय म्हटले उच्च न्यायालयाने
बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा लावताना नियमानुसार कारवाई झाली नव्हती. तसेच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणातून पुरावे गोळा करताना नियम पाळले नव्हते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच प्रोसिक्युशनने ठेवलेले पुरावे जी. एन. साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकले नाहीत. या आधारावर जी. एन. साईबाबा, प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिरकी आणि विजय तिरकी या सर्वांची न्यायालयाने सुटका केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor