गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेली चिमुरडी अशी सापडली
नाशिक येथील खोले मळ्यातून पाच दिवसांपासून बेपत्ता झालेली १० वर्षांची चिमुकली पंचवटीत सुखरुप सापडली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मुलगी सुखरुप असल्याने नागरिक व कुटुंबियांना आनंदाआश्रू अनावर झाले. गेल्या महिन्यात जेलरोड भागातून रात्रीच्या वेळी बेपत्ता झालेल्या चिमुकलीला अवघ्या सहा तासांत नागरिकांच्या सतर्कतेने व पोलीस पथकाच्या अथक प्रयत्नांनी शोधण्यात यश आले. ही घटना ताजी असतानाच २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या खोले मळ्यातून दूध आणण्यासाठी घराबाहेर आलेली १० वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली. याप्रकरणी तिच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर नाशिक शहर पोलीस, श्वान पथक, गुन्हे शाखा, उपनगर व नाशिकरोड पोलिसांची विविध पथकांनी शहराबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानक, झोपडपट्टी, मुलीच्या आजूबाजूची ठिकाणे पिंजून काढली होती. चार दिवस उलटूनही मुलगी सापडत नसल्याने चिंता वाढत होती.
शुक्रवारी (दि.४) पंचवटीतून मुलीच्या वडिलांना मुलगी असल्याची कॉलवरुन माहिती दिली. त्यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक विजय पगारे व पथकांनी पंचवटीत जात मुलीला ताब्यात घेतले. मुलगी सुरक्षित सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, महिला पोलिसांच्या मदतीने मुलीला वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करुन तपासातून गुन्हे दाखल करण्याबाबत दिशा ठरवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.