शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'ग्रंथाली' अभिवाचन स्पर्धा

‘ग्रंथाली’ प्रकाशन व साहित्य संस्थेच्या वतीने गेली ४१ वर्षे वाचक दिन साजरा केला जात असून या वर्षीचा ४२ वा वाचक दिन २४ व २५ डिसेंबर असे दोन दिवस साजरा केला जात असून या निमित्ताने २४ डिसेंबर रोजी खुल्या अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
अभिवाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालय, संस्था पातळीवर कोणत्याही संघाला सहभागी होता येईल. या स्पर्धेमध्ये नाटक वा एकांकिका अशा सादरीकरणसज्ज साहित्य प्रकार सादर करता येणार नाही. कथा, कविता, आत्मवृत्त, वैचारीक लेख किंवा संमिश्र स्वरुपात सलग नाट्यात्म अनुभूती देणार्‍या कोणत्याही साहित्य प्रकाराचे वाचन या स्पर्धेत करता येईल. मात्र कवितांचे केवळ सादरीकरण न करता त्यावर अभ्यासपूर्ण संहितालेखन केलेले असल्यास त्याचे अभिवाचन या स्पर्धेत करता येईल. सादरीकरणाचा कालावधी १० ते १३ मिनिटे राहील. स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन असावी. या स्पर्धेमध्ये वाचिक अभिनयाला सर्वोच्च महत्व दिले जाणार असून सादरीकरणामध्ये पार्श्वसंगीताचा वापर करता येईल. मात्र त्यासाठी वेगळे गुण असणार नाहीत. या स्पर्धेमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा आदी घटकांना स्थान राहणार नाही. स्पर्धेतील सांघिक विजेत्यांना प्रथम रु. २५०० रोख, द्वितीय रु. १५०० रोख व तृतीय रु. १००० रोख आणि तिन्ही क्रमांकांना तेवढ्याच रकमेची पुस्तके अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
 
नाव नोंदणीची अंतीम तारीख २० डिसेंबर असून अधिक माहिती व नावनोंदणीकरीता इच्छुकांनी चंद्रकांत मेहेंदळे, समन्वयक यांच्याशी ९३२३४८७०२५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथालीने केले आहे.