रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (17:39 IST)

'या' 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? वाचा-

shinde panwar fadnavis
4 ऑक्टोबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.अनेक महिन्यांपासून या जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण असणार याबाबत राज्यात चर्चा होत होत्या मात्र आता अखेर एकनाथ शिंदेंनी या यादीची घोषणा करून ही चर्चा थांबवली आहे.
 
या यादीत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पुण्याच्या पालमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाची धुरा अजित पवारांच्या हातात असणार आहे.
 
अजित पवार गटाच्या सात जणांना पालकमंत्रिपद
या यादीमध्ये अजित पवार यांच्या गटातील सात आमदारांना पालकमंत्रीपद दिलेलं असून.
 
अजित पवार गटातील आमदारांना पालकमंत्रीपद देण्यासाठी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांचे पूर्वीचे जिल्हे सोडून नवीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
कोल्हापूरवरून पुण्याला आलेल्या चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली असून, महायुतीत समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी ही यादी जाहीर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे
 
12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
 
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
 
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
 
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
 
भंडारा- विजयकुमार गावित
 
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
 
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
 
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
 
बीड- धनंजय मुंडे
 
परभणी- संजय बनसोडे
 
नंदूरबार- अनिल भा. पाटील
 
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
 
पालकमंत्र्यांचं काम काय असतं?
पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणे ही देखील पालकमंत्र्यांची जबाबदारी असते.
 
जिल्ह्यावर नियंत्रण ठेवता यावे म्हणूनही पालकमंत्री होण्याची अनेक राजकीय नेत्यांची इच्छा असते. 2004 पासून महाराष्ट्रात पालकमंत्री ही संकल्पना राबवली जात आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून देखील पक्षांकडून या पदाचा वापर केला गेल्याची उदाहरणे आहेत.
 
उदाहरणार्थ बारामती विधानसभा क्षेत्रातून आमदार झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री बनवले गेले आणि नंतरच्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार झपाट्याने झाल्याचे पहायला मिळाले.
 
मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे, एक्सप्रेस वे, विमानतळ, रेल्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायाने पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते.
 
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो.
 



Published by- Priya Dixit