गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (12:33 IST)

राज्यात जोरदार पाऊस, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
 
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. 
 
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वारासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील ७ अशा १७ जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी येतील.
 
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे थंडीचा प्रभाव कमी होणार असून मुंबई, कोकण आणि विदर्भात थंडी कायम राहणार आहे.
 
अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मात्र, 29जानेवारीनंतर पुन्हा तापमानात घट हऊन थंडीचा जोर राज्यभरात वाढण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit