बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (07:42 IST)

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अतिदक्षतेचा इशारा

rain
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात मोठी आपत्ती निर्माण झाली. आता पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
 
राज्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मोठे संकट ओढवले होते. दरम्यान आणखी चारदिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून विशेषतः कोकण, मराठवाडासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसेच ओडिशा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह गुजरात तटपासून कर्नाटक तटापर्यंत होत असलेल्या हवामान बदलामुळे १२ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
मुंबईतदेखील येत्या २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विशेषतः दक्षिण आणि पश्चिम भारतात मान्सूनचे ढग सतत बरसत आहेत. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात किमान १३० गावे बाधित झाली असून त्यापैकी 128 गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
भारतीय हवामान विभागाने एका म्हटले आहे की, पुढील पाच दिवस मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी झाली.