शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (14:02 IST)

सिनेमॅटीक लिबर्टी घेतल्याशिवाय इतिहास सांगताच येत नाही – राज ठाकरे

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुडाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. दिवसांपूर्वी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केलं आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, “जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या एका कार्यक्रमावेळी ते सात वीर कोण होते असा गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांपूर्वी मी गजाजन मेहेंदळे यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते सात होते की आठ होते याचा उल्लेख नाही.
 
इतिहासातील कोणत्याही पानावर प्रतापराव गुजरांबरोबर कोण लोक होते याचा उल्लेख केलेला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सगळी काल्पनिक आहेत.
 
छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजरांना पत्र पाठवलं असं कोणतंही पत्र आतापर्यंत सापडलेलं नाही. प्रतापराव गुजर मारले गेले या दोन ओळी कोणत्यातरी पानात ओझरता उल्लेख आहे. याच्याशिवाय कोणताही उल्लेख इतिहासाच्या पानात नाही.
 
इतिहाच्या तर्कावरून स्फुरण चढेल अशा काही कथा असतात. जसे पोवाडे उभे केले जातात तशी ही गोष्ट उभी केली गेली.”
 
“इतिहास सांगायला गेला तर तो रुक्ष आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल हे घडलं आहे त्याला कोणताही धक्का न लावता, त्याला त्रास न होता हा इतिहास उभा करतात. त्यामुळे कोणती नावं होती याला काहीही अर्थ उरलेला नाही.
 
त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय इतिहास दाखवूच शकत नाही असं खुद्द इतिहासकारच म्हणतात.” असं राज ठाकरे म्हणाले. शिवरायांचा वापर हा कायम जातीय राजकारणासाठी केला जातो. आधीच्या लोकांना काय इतिहास माहिती नव्हता काय?
 
या संपूर्ण जातीय राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून झाली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
 
नेमका वाद काय?
चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची घोषणा केलीय.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. पण या चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला. तसंच त्यातील कथेलासुद्धा काही लोकांना आक्षेप घेतला.
 
कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या नेसरी गावात ही लढाई झाली, त्या गावातील ग्रामस्थांनी सात वीरांची नावं सिनेमामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा दावा केला आहे.
 
तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठी वीर दौडले सात या चित्रपटाला विरोध दर्शवला.
 
ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. पण, पगडी काढलेली मावळे दाखवण्यात आली आहे तो शोकसंदेश असतो. इतिहासाची मोडतोड करून सिनेमा काढले गेले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही."
 
यादरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्या पात्राचा फोटोही दाखवला, ते म्हणाले, "हे मावळे वाटतात का?"
 
"सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते आणि सिनेमात सादर केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमांबाबत आणि मावळ्यांबाबत आम्ही हे मुळीच सहन करणार नाही," असंही संभाजीराजे म्हणाले.
 
"असे सिनेमा लोकांपुढे कसे घेऊन जायचे? शिवाजी महाराज, त्यांचे मावळे ही आपली प्रेरणा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी कशी चालेल? इतिहासाचा गाभा का सोडत आहेत?” असा सवाल त्यांनी केला.