1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)

होळी अन रंगोत्सव साजरा करतांना घ्या खबरदारी

वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगण्याचे महावितरणचे आवाहन
होळी, धुळवड आणि विविध रंगांची उधळण करीत येत असलेल्या रंगपंचमी या सलग सणांच्या मालिकेत संभाव्य वीज अपघात टाळण्यासाठी खबरदारीची आवश्यकता आहे. होळी पेटविताना व रंगांची उधळण करताना वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगून सणांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत, याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून अपघाताचा धोका संभवतो. तसेच अनेक ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यात आल्या असून या भूमिगत वीज वाहिन्यांपासून दूर अंतरावर होळी पेटवावी. जेणेकरून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. शक्यतो मोकळ्या जागेत, मैदानावर होळी पेटवावी. विजेचे अपघात प्राणघातक ठरू शकतात, एक चूकही जीवावर बेतू शकते हे लक्षात ठेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी.
रंगोत्सव साजरा करतांना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकतांना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करणे टाळा. विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्या. घरात होळी खेळतांना वीज मीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करा व ओल्या हाताने या वस्तू हाताळणे टाळा. आवश्यक ती खबरदारी घेऊन होळी, धुळवड व रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
हे लक्षात ठेवा
- वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा
- वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
- ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा
- वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका