शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (15:58 IST)

आले तुफान किती जिद्द ना सोडली', ऐन पुरात गडचिरोलीचे तरुण पोलीस भरतीसाठी कसे पोहोचले?

जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर एव्हाना 'आले तुफान किती जिद्द ना सोडली' या गाण्यावरील रील्स तुम्ही पाहिल्या असतील. पण गडचिरोलीच्या तरुण-तरुणींसाठी हे गाणं खरोखरंच लागू होत आहे.जिद्द असेल तर अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय गडचिरोलीतील पोलीस भरतीच्या उमेदवारांनी दिला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाल्यामुळे दळणवळण थांबले होते अशा परिस्थितीत या तरुणांनी पोलीस भरतीच्या परीक्षेला हजेरी लावल्यामुळे उमेदवारांचे तसेच पोलिसांचे कौतुक होत आहे.
 
पावसामुळे जिल्ह्यातले 40 मार्ग बंद आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा उर्वरीत जिल्ह्यासोबत संपर्क तुटला होता.अशा परिस्थितीतही रविवारी गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.जिल्ह्यात पूर परिस्थिती असतानाही 99 टक्के उमेदवारांनी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी हजेरी लावली होती. पुरानं हाहाकार माजवला असताना पोलीस भरतीची परीक्षा कशी पार पडली?
 
नक्षल सप्ताह सुरू असताना नक्षलग्रस्त भागातल्या उमेदवारांना परीक्षेसाठी येताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? पोलीस भरतीसाठी जिल्ह्याच्या इतर भागातून उमेदवार कसे पोहोचले? तसेच गडचिरोलीत पुराची स्थिती काय आहे यावर एक नजर टाकूया
 
आठ दिवसांपासून गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसानं हुलकावणी दिली. पण, 21 जुलैपासून पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय.
 
त्याचा सर्वाधिक फटका बसला तो गडचिरोली जिल्ह्याला. गडचिरोलीत आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आलाय.
गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्यानंही वैनगंगेला पूर आला आहे. पुरामुळे सुरुवातीला चार दिवस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या मार्गांसह लहान लहान मार्ग देखील बंद होतं.
दोन दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं पूर ओसरुन मार्ग सुरू झाले होते. पण, त्यानंतर पुन्हा पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा नद्यांना पूर आला. त्यानंतर गडचिरोलीतले 40 मार्ग बंद होते.
पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागडमधली वस्ती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
 
भामरागड तालुक्याचा उर्वरीत जिल्ह्यासोबत संपर्क तुटला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडायचं कसं असा प्रश्न नागरिकांसमोर होता.सध्या गडचिरोली मध्ये पावसाने विश्रांती घेतली असून पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
 
'आम्ही पुरात अडकलोय, परीक्षा द्यायची कशी?'
अबूजमाड आणि आजूबाजूच्या नक्षलग्रस्त भागातल्या तरुण-तरुणींनी गडचिरोली पोलीस भरतीसाठी अर्ज केले होते.शारीरिक चाचणीतून उत्तीर्ण होऊन हे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. पण, पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा उर्वरीत जिल्ह्यासोबत संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीवघेण्या पुरातून 150 किलोमीटर दूर असलेल्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयात परीक्षेसाठी जायचं कसं असा प्रश्न होता.

त्यामुळे या भागातल्या 20 विद्यार्थ्यांनी भामरागड पोलीस स्थानकाला फोन केला. आम्हाला पोलीस भरतीची परीक्षा द्यायची आहे. पण, गावातून बाहेर पडू शकत नाही इतका पूर आहे. त्यामुळे आम्हाला मदत करा, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी पोलिसांना केली.त्यानंतर गडचिरोली पोलीस मुख्यालयातून या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यासाठी लगेच मदत करण्यात आली.
 
पुराच्या पाण्यातून विद्यार्थी असे पोहोचले परीक्षा केंद्रावर
पोलीस भरतीची लेखी परीक्षा 28 जुलै (रविवारी) होती. त्यासाठी 27 जुलैला शनिवारी 4 तरुणींसह 20 उमेदवारांना महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या अबूजमाड परीसरातून काढून पर्लकोटा नदीच्या पुरातून बोटीनं ताडगाव पोलीस स्टेशनला आणलं.
 
तिथून पोलिसांच्या वाहनानं या सगळ्या विद्यार्थ्यांना एटापल्लीला पोहोचवलं. एटापल्ली इथं विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. त्यांना पोलिसांकडून जेवण पुरविण्यात आलं. त्यानंतर शनिवारीच सायंकाळी एटापल्लीतून पोलिसांच्या वाहनानं गडचिरोलीला परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आलं.
 
महिला उमेदवारांची 100 टक्के हजेरी
जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीमुळे आपल्याला परीक्षा देता येईल की नाही या चिंतेत विद्यार्थी होते. आपण शारीरिक चाचणी तर उत्तीर्ण झालो. पण, आता पुरामुळे लेखी परीक्षा देता येणार नाही या चिंतेत विद्यार्थी होते. पण, पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीनं त्यांना गडचिरोलीत परीक्षा केंद्रावर पोहोचवलं. यामुळे विद्यार्थी समाधानी असल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "28 जुलैपासून नक्षल सप्ताह सुरू झाला आहे. त्यातही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून होत आहे. तरीसुद्धा पोलीस भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये 1202 तरुणी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरल्या होत्या."
 
या सगळ्या तरुणींची परीक्षेसाठी 100 टक्के हजेरी होती. नक्षलग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली असून आता ते आपल्या गावी परतत आहेत. पण, सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही या विद्यार्थ्यांची नावे समोर आणू शकत नाही.
 
किती उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची परीक्षा?
गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई पदासाठी 912 जागांसाठी गडचिरोली पोलीस दलानं लेखी परीक्षा घेतली. यापूर्वी 21 जुलै ते 13 जुलैपर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयात मैदानी चाचणी घेण्यात आली होती. यावेळी गडचिरोलीत मुसळधार पाऊस होता.त्यामुळे एक दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यामधून एकूण 6 हजार 711 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते.
 
त्यांची रविवारी 28 जुलैला लेखी परीक्षा घेण्यात आली. गडचिरोलीतल्या 11 केंद्रांवर तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली असून 54 उमेदवार गैरहजर होते.
Published By- Priya Dixit