रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जून 2020 (08:15 IST)

चक्रीवादळाची शक्यता, मुंबई, ठाणे, आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
 
दुसरीकडे १ जूनलाही काही भागात वाऱ्यासह थोड्या पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या १२ तासात पूर्वपश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या २४ तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्री वादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.
 
हे चक्रीवादळ सुरुवातीला २ जूनला पहाटे उत्तरेकडे आणि नंतर उत्तर इशान्येकडे वळेल. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या जवळ हे वादळ ३ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर १ ते ४ जून दरम्यान भरपूर पावसाची शक्यता आहे. १ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार, अति किंवा अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.