शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (09:31 IST)

'मी म्हणालो, मंत्रिपद गेलं तरी चालेल...'-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

nitin
कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रसिद्ध आहेत. अनेक व्हीडिओंमधून ते आपण पूर्वी कशाप्रकारे स्पष्ट उत्तरं दिली हे भाषणात सांगत असल्याचं दिसलं आहे.
आताही अशाच एक भाषणाचा व्हीडिओ समोर आला आहे. यामध्ये नितीन गडकरी यांनी एक जुना अनुभव सांगितला आहे.
 
गडकरी म्हणाले, "आपला निर्णय गरिबाच्या हिताचा असेल आणि त्याला न्याय मिळणार असेल तर कायदा तोडा असं महात्मा गांधींनी सांगितलं होतं. पण वैयक्तिक स्वार्थ किंवा इतर कोणतं उद्दिष्ट असेल तर ते चुकीचं आहे."
 
"मी महाराष्ट्रात मंत्री असताना अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अडीच हजार मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर हाहाकार माजला होता. त्यावेळी आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी मला ही नेमकी काय स्थिती आहे, मेळघाटातील 450 गावात एकही रस्ता नाही याबद्दल विचारणा करायचे," असं ते सांगतात.
ते पुढं म्हणाले, "मी मंत्री असल्याने बैठका घेत असायचो. अधिकारीही बैठकीला असायचे. एकदा मनोहर जोशी यांनी त्यांना 'इतकी लोकं मेली तुम्हाला काहीच वाटत नाही का? मुलं शाळेत नाही जाऊ शकत, वीज नाही आणि तुम्ही वन पर्यावरण कायद्यांअंतर्गत काहीच करु देत नाही' अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने 'माफ करा, पण मी असहाय्य आहे, काहीच करु शकत नाही' असं उत्तर दिलं".

"यानंतर मला राहावलं नाही. हे माझ्यावर सोडा, काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, पण मी हे काम करणार असं मी अधिकाऱ्याला सांगितलं. तुम्हाला शक्य झालं तर माझ्या पाठीशी उभे राहा, नाही राहिलात तरी हरकत नाही. मंत्रिपद गेलं तरी चालेल असं म्हटलं होतं," अशी आठवण गडकरींनी सांगितली.
 
ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'नौकरस्याही के रंग' या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे झाले. त्या कार्यक्रमात गडकरी यांनी ही आठवण सांगितली आहे.