शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (14:41 IST)

शिवसेना संपायला हवी, असं मला कधीही वाटणार नाही- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
नाशिक: शिवसेनेतले प्रभावी नेते एकनाथ शिंदेनी  बंड पुकारल्यानंतर, राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेतील  एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतले जवळपास सर्वच मंत्री शिंदेंच्या गटाला सामील झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात कायदेशीर संघर्ष होताना दिसत आहे. पण, शिवसेना विधिमंडळ पक्षातील जवळपास दोन तृतीयांश सदस्य शिंदे गटात सामील झाल्याने, आता पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
 
अशातच नाशिकचे माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना या विषयावर मत व्यक्त केले आहे. छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ज्या पक्षातून झाली आहे, त्या शिवसेनेच्या अस्तित्वाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. माझ्यासारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की, शिवसेना संपायला पाहिजे.”
 
भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यातील नव्या सरकार बाबत बोलताना, नवीन काही होत असेल, तर आम्ही वाईट बोलणार नाही, असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केले आहे. सत्तेची दोरी हातात घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा नियोजन समितीत मंजूर झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देत, भुजबळांना जोरदार झटका दिला.
 
त्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, “नाशिक जिल्ह्यात नियोजन समिती अंतर्गत सगळ्यांना समान निधी वाटप केला होता. मात्र, आता तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, नवीन पालकमंत्री आल्यावर निर्णय होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
 
तसेच नाशिकवर सध्या पाणीकपातीचे संकट गडद असल्याने, यावर देखील भुजबळांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पाऊस सुरू असला, तरी नाशिकमध्ये अजून पाऊस आलेला नाही. जिल्ह्यात फक्त १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या तर झाल्या, मात्र पाऊस नाही. नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त २८ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे, भुजबळ यांनी म्हटले आहे.