कोरोना निर्बंधांबाबत राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ एप्रिलपासून अंमलबजावणी
गेल्या दोन वर्षांपासून असलेले कोरोना निर्बंध अखेर संपुष्टात येणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार, राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्वच निर्बंध मागे घेतले जाणार असून केवळ मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे.सुमारे दोन ते अडीच वर्षांपासून हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूवर आता भारतानेही नियंत्रण मिळविले आहे. कोरोनाच्या महामारीने दोन वर्षे सर्वांचीच कठीण परीक्षा पाहिली आहे. आता मात्र, अत्यंत दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. त्याचीच दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. मात्र, मास्क घालण्याची सक्ती तेवढी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणू संदर्भात जारी केलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. देशात सातत्याने कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोविड निर्बंध जवळजवळ दोन वर्षे लागू होते.
31 मार्चपासून सर्व निर्बंध उठवले जातील. केंद्र सरकारने कोरोनाची प्रकरणे रोखण्यासाठी 24 मार्च 2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तरीही आता केवळ फेस मास्क घालणे आवश्यक असेल.केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डीएम कायद्यांतर्गत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकण्यास सांगितले आहे. याबाबत ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे की यापुढे डीएम कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आवश्यकता नाही.या नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. यानंतर गृह मंत्रालयाकडून कोणताही आदेश जारी केला जाणार नाहीत.