नागपुरात कर्जामुळे तणावात येऊन कंत्राटदाराची गळफास घेत आत्महत्या
नागपुरात सरकारी विभागांकडून 30-40 कोटी रुपयांची थकबाकी आणि बाजारातून घेतलेल्या कर्जामुळे
तणावाखाली येत कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्मा यांनी विविध सरकारी खात्यांमध्ये काम केले होते.
या कामासाठी सरकारचे त्यांच्यावर 30 ते 40 कोटी रुपये देणे होते. हे काम करण्यासाठी त्यांनी बाजारातून कर्जही घेतले होते. हे कर्ज फेडू न शकल्याने वर्मा तणावाखाली होते. वर्मा यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हैदराबादमध्ये राहतात. कधीकधी ते नागपूरला येतात आणि तिथेच राहतात आणि कधीकधी वर्मा त्यांच्यासोबत राहण्यासाठी हैदराबादला जातात.
सदर घटना सोमवारी सकाळी त्यांचे मित्र त्यांच्या घरी गेल्यावर उघडकीस आली. अनेकदा दार ठोठावून देखील आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने सुरक्षा रक्षकाला बोलावण्यात आले त्यांनी देखीलआरडा ओरड करत दार उघण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांना देखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या कुलुपाची चाबी दररोज काम करणाऱ्या मावशींकडे असायची. मावशींशी संपर्क साधून कुलूप उघडल्यावर घरात मयत मुन्ना वर्मा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. घरात पोलिसांना झडती घेतल्यावर कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.
पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून कुटुंबीयांतील सदस्यांचे जबाब नोंदवले आहे. वर्मा यांच्या मित्रांची आणि जवळच्या लोकांची चौकशी केल्यावर ते कर्जबाजारीमुळे तणावात असल्याचे समजले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit