फी न भरल्याबद्दल संस्थाचालकाची पालकाला मारहाण, दुर्देवी मृत्यू
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा (एरंडेश्वर) येथील हाय-टेक निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना मारहाण करून ठार मारल्याची भयानक घटना समोर आली आहे. मृताचे नाव जगन्नाथ पांडुरंग हेंडगे (वय 37, रा. उखलाद, तालुका परभणी) असे आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी संबंधित शाळेत शिकत होती.
झिरो फाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची एक हायटेक निवासी शाळा आहे. उखलाद तालुक्यात राहणारे जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी पल्लवी हिला या निवासी शाळेत दाखल केले होते.
मुलीला शाळा आवडली नसल्यामुळे ते गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हेंडगे हे शाळा टीसी घेण्यासाठी आणि शुल्क संबंधित माहिती घेण्यासाठी शाळेत आले. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला टीसी देण्याची विनंती केली. या वरून शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि उर्वरित फीस न भरल्यावरून वाद केले. नंतर हेंडगे यांना जबर मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.मृत जगन्नाथ हेंडगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि २ मुली असा परिवार आहे.परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या तक्रारीवरून संस्थेचे संचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध बीएनएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हेंडगे यांचे नातेवाईक मुंजाजी रामराव हेंडगे (रा. उखलाड) यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संस्था चालवणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील आणि पोलिस निरीक्षक विलास गोबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
Edited By - Priya Dixit