शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 एप्रिल 2023 (21:18 IST)

हे गारपीट की आणखीन काही ...

garpit
अभेटी गावात गारपीट,घराचे पत्रे उडाले, कौलं फुटली, आंब्याची बाग उध्वस्त
अशाप्रकारे गारपीट कधीच झाले नाही, गावकऱ्यांची प्रतिक्रीया
नाशिक : प्रनाशिक जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी गारपिटीसह आलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान केले आहे. चांदवड, देवळा, सिन्नर, बागलाण, पेठ या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीची नोंद करण्यात आली आहे.
 
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यात पेठ तालुक्यातील अभेटी, आमलोन, बरडापाडा, शेवखंडी आदी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अभेटी गावात सोमवारी  सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने गावातील घरांचे अतोनात नुकसान केले आहे.
 
गारांचे गोळेच्या गोळे घरांवर कोसळत होते. अनेक घरांची कौल फुटली, अनेक घरांचे पत्रे उडाली. आंब्याची बाग तर पूर्ण झोडपून काढली आहे. एकही आंबा शिल्लक राहिलेला नाही. ‘गावात अशाप्रकारे गारपीट कधीच झालेली नाही. पूर्वी गारपीट व्हायची तर पडलेल्या गारा लगेच विरघळून जायच्या. पण इथे तर दोन दिवस झाले गारा जश्याच्या तश्याच आहेत,’ अशी प्रतिक्रिया पेठ तालुक्यातील अभेटी गावातील नागरिक देत आहेत.
 
पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे आहे. गेल्या तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. या गारपिटीत कुणाच्या घराचे पत्रे उडाली, कुणाची कौलं फुटली, आंब्याची बाग उध्वस्त झाली. गावकरी पावसात नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत मात्र पाऊस थांबला नाही तर काय करायचे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. पेठ तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी पाहणी करत पंचनामे केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे, मात्र वेळेवर थोडीफार मदत मिळाली तरी बरं होईल, अशी अपेक्षा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
सुरुवातीला पाऊस सुरू झाला तेव्हा त्याचे स्वरुप साधारण होते. पण अगदी काही क्षणातच घरांवर गारा बरसू लागल्या. या गारांमुळे कौलं फुटून पाणी थेट घरात येऊ लागलं. हा पाऊस अत्यंत भितीदायक होता. एवढा भयंकर पाऊस आणि गारपीट यापूर्वी कधीच झाली नाही, असे गावकरी सांगतात. 
Edited by : Ratnadeep Ranshoor