बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (14:42 IST)

औरंगाबाद निषेधार्ह; सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी - जयंत पाटील

काल रात्री  औरंगाबाद येथे दोन गटांत किरकोळ वाद होऊन त्याचे पर्यावसान दंगलीत झाले. या घटनेचा निषेध करताना भाजप सरकारला महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आले आहे हेच यावरून दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन समाजांत तेढ निर्माण होऊन त्याचे दंगलीत रूपांतर होत असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. अशा परिस्थितीत रात्रभर पोलिस काय करत होते आणि पर्यायाने गृहखाते काय करत होते, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

सत्तारूढ पक्षाचे प्रमुख नेते रस्त्यांनी फिरून एका गटाची बाजू घेत भांडण मिटवण्याऐवजी आणखी वाद वाढवत आहेत. तणाव निर्माण व्हावा अशी या सरकारची मानसिकता का, असेही ते म्हणाले. दंगल सरकार थांबवू शकले नाही, पण आता या घटनेतील आरोपींना पकडण्याचे काम तरी सरकारने करावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.