मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या
मुख्यमंत्र्यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा इच्छामरणाच्या अर्जाला रीतसर परवानगी द्यावी, यासाठी राज्यातील वीज कंत्राटी कामगार सोमवार (७)पासून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.
महावितरणमधील नियमित मंजूर रिक्त पदांच्या जागेवरील सुमारे पंधरा वर्षे कार्यरत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर व्हाव्यात व भरतीमध्ये अनुभवी कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे, आरक्षण वयात सूट द्यावी, शैक्षणिक पात्रता निकष बदलून १० वीच्या गुणांनुसार मेरिट ग्राह्य न धरता त्या उद्योगातील आयटीआयचे गुणांनुसार मेरिट ग्राह्य धरावे, या मागण्या केल्या आहेत.
आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारल्याने कंत्राटी कामगार आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जय कामगार ही घोषणा केली. मात्र, कामगारांच्या पदरी निराशाच आहे. कामगारांना न्याय द्यावा यासाठी तीन प्रमुख कंत्राटी कामगार संघटनेची कृती समिती स्थापन झाली. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ, तांत्रिक अप्रेंटीस, कंत्राटी कामगार (कर्म) असोसिएशन व महाराष्ट्र वीज बाह्यस्रोत कामगार संघटनेने कामगारांना न्याय मिळेपर्यंत शासनाशी लढा देण्याचा निर्धार केला आहे.