कुंदेवाडी रेल्वेगेट ३ दिवस बंद राहणार, "हे" आहे कारण
सुरत-शिडों महामार्गावर कुंदेवाडीजवळील रेल्वे फाटकाला काल दुपारी दीडच्या सुमारास ट्रकने धडक दिली. यामुळे गेट बंद पडल्याने दोन्ही बाजूकडून सुमारे एक तास वाहतूक रखडली होती. एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान नादुरुस्त रेल्वे गेट चे काम दि. २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर यादरम्यान केले जाणार असल्याने कुंदेवाडी रेल्वे गेट क्रमांक-९९ वरील तारखांना सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत गेट बंद ठेवले जाणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे
शिर्डीकडून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकने निफाड रेल्वेस्थानकालगत असलेल्या रेल्वेगेटला जोराची धडक दिली होती. त्यामुळे पिंपळगावकडून रेल्वे गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेट बंद पडले. त्यामुळे सुमारे एक तास दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, तर कुंदेवाडी गावापासून एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दिवाळी सुट्टीनंतर गुजरातमधील भाविक शिर्डीला साई दर्शनासाठी जात आहेत.
त्यामुळे सुरत-शिडीं मार्गावर वाहतूक वाढली आहे. रेल्वे गाड्याचा अप अन् डाऊन प्रवास सुरुच असतो त्यामुळे दोन्ही बाजूकडून वाहतूक रोखली जाते. शुक्रवारी गेट बंद झाल्याने एक तास वाहतूक रोखल्याने साई भक्त, प्रवासी, बसमधील विद्यार्थ्यांना गाडीतच बसून राहण्याची वेळ आली. वेळ वाया गेल्याने अडकलेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या दरम्यान रेल्वे विभागाने पत्र प्रसिध्द करुन कळविले आहेत कि गेट क्रमांक ९९ नादुरुस्त झाल्याने दि. २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सदरचे गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.