1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. light rain accompanied by lightning likely today in Konkan, Pune, Satara, and Kolhapur regions

मान्सून परतीच्या वाटेवर; आज कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात विजांसह हलक्या पावसाची शक्यता

मुंबई/पुणे : राज्यातून नैऋत्य मान्सूनची माघार सुरू झाली असून पावसाचा जोर आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. तरीही स्थानिक हवामान बदलांमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आजही विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
 
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज (१ ऑक्टोबर) कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर आणि सांगली या भागांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण थोडे जास्त राहू शकते, तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक तुरळक स्वरूपाचा असेल.
 
मागील काही दिवसांत पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा तसेच काही मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आज मात्र अलर्टची तीव्रता कमी झाली असून बहुतांश ठिकाणी फक्त सतर्कतेचा इशाराच आहे. उर्वरित महाराष्ट्रात बहुतांशी ढगाळ वातावरण राहील आणि काही भागांत उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
 
मान्सूनच्या परतीमुळे तापमानातही हळूहळू वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत कमाल तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढू शकते. मात्र, स्थानिक पावसामुळे उकाडा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
 
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनची माघार पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत कोकण आणि घाट परिसरात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरींची शक्यता कायम राहील.
 
नागरिकांना सूचना
विजांच्या कडकडाटाच्या वेळी घराबाहेर फिरणे टाळावे, उघड्या जागी किंवा झाडांखाली उभे राहू नये. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. अधिक अद्ययावत माहितीसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक हवामान केंद्राकडे लक्ष ठेवावे.
पुढील लेख
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक; संजय राऊत-आदित्य ठाकरे पोलिस स्टेशनला