गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (16:47 IST)

मुंबई : मराठा मोर्चाची तयारी पूर्ण

मुंबईत मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळांना सुट्टी राहील. दरम्यान, मोर्चात मुंबईचे डबेवालेही सहभागी होणार असून उद्या सेवा बंद राहील, अशी माहितीही देण्यात आली.

मुंबईतील भायखळा येथून सकाळी ११ वाजता मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदानात मोर्चाची सांगता होणार आहे. या मोर्चात अंदाजे पाच लाख लोक सहभागी होतील, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील मोर्चात सर्वाधिक गर्दी उसळेल, असा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. मोर्चात होणारी गर्दी आणि उद्भवणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सायन ते कुलाबा दरम्यानच्या सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.

दरम्यान, मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोर्चावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलिसांची करडी नजर असणार आहे. तसंच हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी ७ हजार पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. मोर्चेकऱ्यांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं नजर ठेवण्यात येणार आहे. मोर्चात अहमदनगर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. आझाद मैदानावर मोर्चाची सांगता होईल. मुंबई महापालिकेनंही मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी सात ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स, ८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, ६ ठिकाणी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.