गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (15:18 IST)

आदिवासी विभागाचा लाचखोर बागुलकडे मायाच माया; नाशिक, पुणे, धुळ्यात संपत्ती… आलिशान घरे…

Bribe
तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले आदिवासी विकास विभागाचा एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर दिनोशकुमार बुधा बागुल याने मोठी माया जमविली असल्याचे निदर्शनास येत आहे. काल रात्री बागुल एसीबीच्या सापळ्यात अडकला. त्यानंतर त्याच्या घराची झडती एसीबीच्या पथकाने घेतली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. बागुलकडे नोटांची अनेक बंडले सापडली आहेत. त्या मोजण्यासाठी एसीबीच्या पथकाला मशिनही मागवावे लागले आहे.
 
शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे कीड चांगलीच फोफावल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात दिवसेंदिवस विविध सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सापडताना दिसत आहेत. आता एसीबीच्या जाळ्यात आदिवासी विकास विभागातील मोठा मासा गळाला लागला आहे. विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल याला तब्बल २८ लाख रुपयांची लाच धेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
 
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी भागात मध्यान्ह भाेजन (सेंट्रल किचन) कक्ष उभारायचा होता. त्याचे बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला २ काेटी ४० लाख रूपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार होते. हा आदेश देण्यासाठी बागुल याने या रकमेच्या १२ टक्के रकमेची मागणी केली. तडजोडी अंती २८ लाख ८० हजार रुपये निश्चित झाले. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. विशेष पथकाने या प्रकरणावर बारकाईने नजर ठेवली. अखेर बागुल याच्या निवासस्थानी पैशांच्या देवाणघेवाणीचे निश्चित झाले. त्यानुसार एसीबीने तेथे सापळा लावला. आणि बागुल हा आपल्याच निवासस्थानी तब्बल २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी बागुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याला मध्यरात्रीच अटक करण्यात आली. थोड्याच वेळात त्याला नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. अधिक चौकशीसाठी एसीबीकडून त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
 
राज्याच्या आदिवासी विकास विकास विभागाचे मुख्यालय हे नाशिक येथे आहे. येथूनच राज्याचा कारभार चालतो. याच विभागात कार्यरत असलेला बागुल हा तब्बल २८ लाखाची लाच घेताना सापडल्याने ही बाब राज्यभर चर्चेची ठरली आहे. तसेच, टक्केवारीचे कमिळन हा मुद्दा सुद्धा आता नव्याने चर्चेत आला आहे. बागुलच्या घरी नक्की किती रक्कम आणि संपत्ती सापडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिडके कॉलनीत त्याचे आलिशान अपार्टमेंटमध्ये घर आहे. त्याची पुणे आणि धुळ्यातही मोठी संपत्ती आहे. या दोन्ही ठिकाणी एसीबीने रात्रीच छापा टाकला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथेही आलिशान घर आहे. नाशिक, धुळे आणि पुण्यातील छाप्यामध्ये बागुलकडील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे, रोकड, सोने आणि अन्य बाबी एसीबीच्या हाती लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीड कोटी रुपयांची रोख रक्कम बागुलच्या घरी सापडली आहे. एसीबीची पथके कसून तपास करीत आहेत. दुपारनंतर बागुलकडील संपत्तीचा आकडा समोर येणार असल्याचे समजते.