6 जूनला मान्सून मुंबईत; 9 जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’
उष्णतेचे उच्चांक गाठले जात असताना गारव्याची चाहूल लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे. कालच अंदमानात मान्सूनचं आगमन झालं आहे. सहा दिवसआधीच मान्सून अंदमानात पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अंदमानात वरुणराजाने लवकर हजेरी लावल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनच आगमन यंदा लवकर होण्याची शक्यता आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत दक्षिण-मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर आता २७ मे रोजी तो केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे. पुढे स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून ६ जूनला मुंबईत तर ११ जूनला मराठवड्यात पोहोचण्याचा अंदाज आहे. याशिवाय ११ जूनपर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मान्सून धडकू शकतो.
कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसांत केरळ किनारपट्टीवर तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.