1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2017 (16:48 IST)

आगामी एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

mpsc exam time table
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०]१७ मध्ये घेण्यात येणार्‍या विक्रीकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक आणि वन सेवा या पदांच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव हा बदल करण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे एमपीएससीने संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
 
एमपीएससीतर्फे २१ नोव्हेंबर २0१६ रोजी स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात विक्रीकर निरीक्षक- २०१६ या पदाची पूर्वपरीक्षा २९ जानेवारी रोजी, तर मुख्य परीक्षा २८ मे रोजी घेतली जाणार असल्याचे नमूद केले होते; परंतु विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा २८ मेऐवजी ३ जून रोजी घेतली जाईल. त्याचप्रमाणो राज्य उत्पादन शुल्क गट 'क' दुय्यम निरीक्षकपदाची पूर्वपरीक्षा २ जुलै रोजी व मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता या पदाची पूर्व परीक्षा २८ मे रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाईल.
 
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७ या पदाची पूर्वपरीक्षा ४ जून रोजी, तर मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती; परंतु बदललेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी होईल. विक्रीकर निरीक्षक व वन सेवा पदाच्या पूर्व परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, शासनाकडून निश्‍चित कालावधीत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतरच वेळापत्रकानुसार पदे जाहीर करून परीक्षा घेतली जाईल असेही एमपीएससीने स्पष्ट केले आहे.