नाना पटोले - 'उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवतायत'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.
स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय.
पटोले लोणावळ्यामध्ये काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहिली हे त्यांना माहितेय. रोज आयबीचा रिपोर्ट, आता मी इथे आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना 9 वाजता, गृहमंत्र्यांना 9 वाजता विभागाला नेऊन द्यावा लागतो. कुठे काय चाललंय, मीटिंग चाललीय, राजकीय परिस्थिती काय, आंदोलन कुठे झालं? त्यांच्या पाया खालची वाळू सरकलीय हे काय कळत नाही? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार."
आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार असल्याचं नाना पटोलेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या कुरबुरींविषयीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती.
पाठीत खंजीर खुपसण्याची आमची वृत्ती नाही, असंही विधान पटोलेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.
त्यावर प्रतिक्रिया द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला होता. 'पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू,' असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
"या गोष्टींत मी पडत नाही. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत, लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केलं असतं," असं शरद पवारांनी म्हटलंय.
"नाना पटोलेंबाबत मी काही बोलणार नाही. मी इथे महागाईवर बोलण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसबद्दल एच. के. पाटील बोलतील. ते उद्या परवा मुंबईत आहेत. तुम्ही त्यांना विचारा", असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज खरगेंची पत्रकार परिषद आहे. आपण तर भेटतच असतो. मी आता यावर काहीच बोलणार नाही असं काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
या वक्तव्यावर अजून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया आली नाही.